मुदाळ येथे कूरच्या उजव्या कालव्याला भगदाड सोळा शेतकर्यांना फटका
By admin | Published: June 5, 2014 01:05 AM2014-06-05T01:05:21+5:302014-06-05T01:05:21+5:30
आठ एकरांतील पिकांचे नुकसान
गारगोटी : मुदाळ (ता. भुदरगड) येथील ‘सुतारकी’ नावाच्या शेताजवळ कूर उजव्या कालव्याला भगदाड पडल्याने सोळा शेतकर्यांच्या शेतात पाणी घुसले. यात सुमारे आठ एकरांतील ऊस व भात पिकांचे नुकसान झाले. काल, मंगळवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास अचानक कूर उजव्या कालव्यास भगदाड पडले आणि पाणी उभ्या पिकात शिरले. यात उसासह नवीनच पेरणी केलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना ग्रामस्थांच्या लक्षात येताच त्यांनी उपकालव्यात पाणी सोडण्यासाठी असलेला मुख्य कालव्यातील स्वीच फिरवून पाण्याचा दाब कमी केला व मोठे नुकसान टळले. रविवारी काळम्मावाडी धरणातून मूळ कालव्याला पाणी सोडले. सोमवारी, सकाळी मूळ कालव्यातून कूर उपकालव्याला पाणी सोडले. मुदाळ येथील सुतारकी नावाच्या शेताचा भूभाग सखली आहे व कालवा उंच भागावरून जातो. पावसाळ््यापूर्वी बसरेवाडीसह मिणचे व इतर पाच गावातील पिके व पिण्यासाठी पाणी मिळण्यासाठी पाटबंधारे विभागाने पाणी सोडले. त्यामुळे पूर्ण दाब व पावसाने कालव्याला भगदाड पडले. कालव्याच्या खालील बाजूची शेतातील माती कृष्णात सुतार यांच्या विहिरीत जमा झाली व विहीर गाळाने भरली. शिवाजी सुतार, आनंदा पाटील, साताप्पा पाटील, बाबूराव सुतार, संभाजी पाटील, आनंदा सुतार, सोनाबाई सुतार, बाळू पाटील, हिंदुराव पाटील, श्रीपती पाटील, गणपती पाटील, राजाराम पाटील, बाजीराव पाटील, लहू पाटील याचे ऊस व भात पिकाचे नुकसान झाले. रात्री उशिरापर्यंत भगदाड मुजवण्याचे काम पाटबंधारे विभागातर्फे सुरू होते. सरपंच विकास पाटील, तलाठी एस. एन. भोई, शाखा अभियंता के. आय. धुरे, ग्रामसेवक, कृषी अधिकारी यांनी नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून पंचनामे केले. या भगदाडाने पुढील काही दिवस पाणी येणार नसल्याने या कालव्यावर विसंबून असणार्या सतरा गावांना फटका बसणार आहे. पिके वाळण्याचा धोका आहे. (प्रतिनिधी)