‘गोकुळ’च्या सभेत मुरलीधर जाधव बेदखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:51 AM2021-09-02T04:51:07+5:302021-09-02T04:51:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलेले आंदोलन आणि त्यांना कार्यकारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या संचालक मंडळाच्या सभेत शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी केलेले आंदोलन आणि त्यांना कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यंनी दिलेल्या लेखी आश्वासनाची चर्चा झाली नाही. व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडेबोले व मार्केटिंग व्यवस्थापक समीर गरुड यांच्या नियुक्तीस संचालक मंडळाने मान्यता देण्यात आली.
शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ‘गोकुळ’ने कामकाजात सहभागी करून न घेतल्याबद्दल मुरलीधर जाधव यांनी ‘गोकुळ’वर मोर्चा काढत जाब विचारला होता. या वेळी मंगळवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत नियुक्ती आदेशाबाबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असे लेखी आश्वासन कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांनी दिले होते. मात्र, संचालक मंडळाच्या बैठकीत त्यावर चर्चाच झाली नाही.
व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडबोले, मार्केटिंग व्यवस्थापक समीर गरुड यांच्या नियुक्तीस मान्यता देण्यात आली. मुंबई येथील जागा खरेदी केल्यामुळे लिंगनूर येथील चिलिंग सेंटर येथील ‘सायलो’ खरेदीचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला.
शासननियुक्त नावांवर आज शिक्कामोर्तब
मुरलीधर जाधव यांची केलेली नियुक्ती रद्द करण्यात आली असून, त्यांंच्याऐवजी शिवसेनेकडून दुसरे नाव देण्यात आले आहे. मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या माध्यमातून हे नाव निश्चित करण्यात आले असून आज, बुधवारी त्यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
गोडेबोलेंच्या कागदपत्रांची पडताळणी
‘गोकुळ’चे व्यवस्थापकीय संचालक योगेश गोडेबाेले यांच्या कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली आहे. गोडेबोले यांनी ‘सायबर डायनामिक्स डेअरी’, बारामती येथे राजीनामा दिला असून ते नोटीस कालावधीवर आहेत.