गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 20, 2023 11:40 AM2023-01-20T11:40:03+5:302023-01-20T11:40:25+5:30

राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले

Muralidhar Jadhav may get another chance in Gokul, the court will decide next Wednesday | गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

गोकुळमध्ये मुरलीधर जाधव यांना पुन्हा संधी शक्य, न्यायालयात येत्या बुधवारी निर्णय 

Next

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या शासन नियुक्त संचालकपदी मुरलीधर जाधव यांनाच पुन्हा संधी मिळण्याची शक्यता आहे. उच्च न्यायालयात यासंदर्भात येत्या बुधवारी (दि.२५) न्यायमूर्ती के. एच. श्रीराम व राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. बुधवारी (दि.१८) झालेल्या सुनावणीवेळी न्यायालयाने जाधव यांची नियुक्ती रद्द करण्याचा आदेश मागे घेता की आम्ही आदेश द्यायला हवा अशी विचारणा करून सरकारला फटकारले आहे. पुढील सुनावणीपर्यंत नवीन संचालकाची नियुक्ती करू नये, असेही बजावले.

गोकुळमध्ये सत्तांतर होऊन सतेज पाटील-हसन मुश्रीफ गटाची सत्ता आल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाधव यांची शासन नियुक्त प्रतिनिधी म्हणून ९ जुलै २०२१ ला नियुक्ती केली. या जागेवर सत्तारूढ गटाला वीरेंद्र मंडलिक यांना संधी द्यायची होती. त्यामुळे जाधव यांना अगोदर महाविकास आघाडीतच संघर्ष करावा लागला. पुढे त्यांना सत्तेत सामावून घेण्यात आले. संचालक मंडळाच्या काही बैठकांना ते उपस्थित राहिले. 

राज्यात सत्तांतर झाल्यावर २१ सप्टेंबर २०२२ च्या आदेशान्वये त्यांचे पद रद्द करण्यात आले. त्यास त्यांनी २८ सप्टेंबरला उच्च न्यायालयात आव्हान दिले. बुधवारी झालेल्या सुनावणीत सरकारने आम्हांला नेमणुकीचा अधिकार आहे तसा तो ती रद्द करण्याचाही असल्याचे प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले. न्यायालयाने त्यास हरकत घेतली. जाधव यांची नियुक्ती निबंधकांनी केली आहे व नियुक्ती रद्दचा आदेश उपसचिवांनी काढला. 

उपसचिव हे निबंधक आहेत का अशी विचारणा न्यायालयाने केली. ज्या कायद्यानुसार त्यांची नियुक्ती केली त्या कायद्यामध्ये त्यांना काढून टाकण्याची काय तरतूद आहे अशी विचारणा न्यायालयाने केली. सरकारने केलेली नियुक्ती सरकार बदलले म्हणून बदलता येणार नाही अशीही टिप्पणी न्यायालयाने केली. त्यांनी संस्थेच्या हितास बाधा पोहोचवली असल्यास तशी निबंधकांनी त्यांना नोटीस बजावून त्यात त्यांच्यासह गोकुळचेही म्हणणे घ्यायला हवे होते असेही न्यायालयाने म्हटले.

पदासाठी चढाओढ

मुख्यमंत्री शिंदे गटात आलेले खासदार संजय मंडलिक यांचे पुत्र वीरेंद्र, खासदार धैर्यशील माने गटा़चे झाकीरहुसेन भालदार आणि महाडिक गटाचे तानाजी पाटील यांनी या जागेसाठी ताकद लावली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर खासदार माने यांच्या बंगल्यावर मुरलीधर जाधव यांनी काढलेला मोर्चा या सगळ्याच्या मुळाशी आहे. त्यामुळे जाधवच राहतात की नव्याला संधी मिळते याबद्दल उत्सुकता आहे.

Web Title: Muralidhar Jadhav may get another chance in Gokul, the court will decide next Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.