कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनातील म्यूरल्सला मिळाली नवसंजीवनी
By संदीप आडनाईक | Updated: February 13, 2025 18:11 IST2025-02-13T18:10:30+5:302025-02-13T18:11:20+5:30
शिल्पांवरील रंग उडून, छिद्रे पडल्यामुळे झाले होते विद्रुपीकरण

कोल्हापुरातील शाहू स्मारक भवनातील म्यूरल्सला मिळाली नवसंजीवनी
संदीप आडनाईक
कोल्हापूर : शाहू स्मारक भवनातील शाहू महाराजांच्या शिल्पांचे विद्रुपीकरण झाल्याचा मुद्दा सोशल मीडियावर तसेच खासदार शाहू छत्रपतींच्या कानावर गेल्यानंतर त्यांनी तत्काळ त्याची दखल घेतली. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केल्यानंतर एकाच दिवसात आदेश निघून या शिल्पाची रंगरंगोटी पूर्ण केल्याने या देखण्या शिल्पाला नवसंजीवनी मिळाली आहे.
संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीनंतर शाहूनगरीत शाहू महाराजांनी उभ्या केलेल्या वास्तू आणि स्मारके जतन आणि संरक्षण करण्याची गरज अधोरेखित झाली आहे. एखादा पुतळा किंवा शिल्प उभारले की त्याच्या देखभालीकडे दुर्लक्षच होते असा अनुभव आहे. दसरा चौकातील शाहू स्मारक भवनाच्या दर्शनी भागात शाहूंचे कार्य दर्शवणारे कार्यशिल्प (म्यूरल्स) शिल्पकार अशोक सुतार यांनी तयार केले. काळाच्या ओघात धुळीमुळे ते विद्रुप झाले होते, तसेच त्यावरील रंगही उडून गेला होता. काही ठिकाणी त्याला छिद्रेही पडलेली होती.
याबद्दल शाहूप्रेमींनी सातत्याने आणि वेळोवेळी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या शिल्पाचे विद्रुपीकरण होत असल्याचा मुद्दा शिव प्रबोधिनीचे विजय पाटील यांनी जिल्हाधिकारी तसेच खासदार शाहू छत्रपतींकडे मांडला. त्यानंतर तत्काळ आदेश निघून या शिल्पाची शिल्पकार अशोक सुतार यांनी रंगरंगाेटी केली. यासंदर्भात त्यांनी सुरुवातीला ९५ हजार रुपयांची निविदा भरली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी विनंती केल्यानंतर ८५ हजार रुपयांत याची रंगरंगोटी पूर्ण करून त्याला नवसंजीवनी मिळाली आहे.
फ्लेक्सची केली दुरुस्ती
शाहूंचा पुतळा कोणाचे लक्ष जाऊ नये अशा ठिकाणी ठेवलेला आहे, आवारात शाहूंचे लावलेले फ्लेक्स खराब झालेले आहेत. या स्मारकाची अवस्था पाहून त्याबद्दल शाहूप्रेमींना प्रेम राहिले की नाही असा जाब विजय पाटील यांनी विचारला होता. हे फ्लेक्सही दुरुस्त करून पुन्हा योग्य जागी बसवण्यात आले आहे.