Kolhapur: खुनातील आरोपी महेश महाराज याची पुन्हा बनवेगिरी, नवरात्रोत्सवात धाराशिवला अनुष्ठान
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2024 01:01 PM2024-10-03T13:01:26+5:302024-10-03T13:02:54+5:30
पोलिस चौकशी करणार का?
कोल्हापूर : पन्हाळा तालुक्यातील देवठाणे मठात तरुणीचा खून केल्याप्रकरणी लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असलेला महेश महाराज सहा महिन्यांनी परतला आहे. नवरात्रोत्सवात नळदुर्ग (जि. धाराशिव) येथील अंबाबाई मंदिरात छातीवर घट बसवून १० दिवस अनुष्ठान करणार असल्याची माहिती त्याने तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत दिली. तरुणीच्या खुनातील भोंदू महाराज पुन्हा उजळ माथ्याने फिरत असल्याने त्याच्यावर पोलिस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एप्रिल २०२४ मध्ये देवठाणे येथील मठात महेश महाराज आणि त्याचा मोठा भाऊ बाळकृष्ण महाराज यांच्यासमोर वैष्णवी लक्ष्मीकांत पोवार (वय २४, रा. शनिवार पेठ, कोल्हापूर) या तरुणीला बेदम मारहाण झाली होती. त्या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला. गुन्हा दाखल होताच दोन्ही महाराज राज्याबाहेर पळाले होते. मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर झाल्यानंतर यातील महेश महाराज पुन्हा बनवेगिरी करण्यासाठी लोकांसमोर आला आहे.
नवरात्रोत्सवात नळदुर्ग येथील मंदिरात छातीवर घट बसवून १० दिवस अनुष्ठान करणार असल्याचे त्याने जाहीर केले. गेल्यावर्षी नवरात्रोत्सवात त्याने श्रीरामपूर (जि. अहमदनगर) येथील मंदिरात असे अनुष्ठान करून लोकांना भुरळ घातली होती. आता पुन्हा तो बनवेगिरी करीत आहे.
पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष
गुन्ह्यातील दोन्ही संशयितांचा शोध घेण्यासाठी लक्ष्मीपुरी पोलिसांची पथके सोलापूर, धाराशिव, अहमदनगर, पुणे जिल्ह्यात जाऊन आली होती. दोघेही राज्याबाहेर पळाल्याने पोलिसांनी त्यांचा शोध थांबवला होता. दरम्यान, त्यांनी मुंबई उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मिळवला. बालयोगी महेश्वरानंद महाराज या नावाने पुन्हा चर्चेत आलेल्या महेश महाराजाची पोलिसांनी चौकशी करावी, अशी मागणी मृत वैष्णवी पोवार हिच्या नातेवाईकांकडून होत आहे. त्यामुळे पोलिस काय करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष आहे.