दारूच्या नशेत गडहिंग्लज तालुक्यात मुलाकडून आईचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 04:42 PM2020-03-16T16:42:16+5:302020-03-16T16:43:36+5:30
किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत लाकडाने डोक्यावर प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून केला. सुनंदा शंकर जावळे (वय ६५)असे मृत महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे रविवारी(१५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संशयित आरोपी विनायक हा पसार झाला आहे.
गडहिंग्लज : किरकोळ भांडणातून पोटच्या मुलानेच दारूच्या नशेत लाकडाने डोक्यावर प्रहार करून वयोवृद्ध आईचा खून केला. सुनंदा शंकर जावळे (वय ६५)असे मृत महिलेचे नाव आहे. गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे येथे रविवारी(१५) रात्री साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. घटनेनंतर संशयित आरोपी विनायक हा पसार झाला आहे.
पोलिस व ग्रामस्थांतून मिळालेली माहिती अशी, वडरगे येथे गुरूवारपासून ग्रामदैवत श्री. गोसावीनाथ देवाची पंचवार्षिक यात्रा (भंडारा)सुरू आहे. यानिमित्त सुनंदा यांच्या विवाहित मुली व पाहुणेमंडळी वडरगेत आली होती. यात्रेनंतर काहीमंडळी आपल्या गावी परत गेली.
रविवारी (१५) रात्री नंदा, त्यांचे पती शिवाजी आणि बहिण वंदना जाधव ही मंडळी देवदर्शन आणि गावातील नातेवाईकांना भेटायला गेली होती. आई सुनंदा आणि मुलगा विनायक हे दोघेच घरात होते. त्यावेळी झालेल्या वादावादीत विनायक याने दारुच्या नशेत लाकडी पट्टीने आईच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला.
लाकडाचा वार वर्मी लागून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने सुनंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. दरम्यान, देवदर्शन घेवून पाहुणेमंडळी घरी परतताच घाबरलेल्या विनायकने दरवाजाला कडी लावून धूम ठोकली.
पाहुणेमंडळी व आजूबाजूच्या लोकांनी कडी काढून दरवाजा उघडला असता सुनंदा या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आढळून आल्या. त्यांनी तात्काळ तिला गडहिंग्लज येथील उपजिल्हा रूग्णालयात उपचारासाठी आणले. परंतु, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.
घटनास्थळी पोलिस उपअधिक्षक अंगद जाधवर, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश काशिद यांनी भेट दिली. नंदा शिवाजी वळतकर (रा. महागाव, ता. गडहिंग्लज) यांच्या फिर्यादीवरून पोलिसात विनायकविरुद्ध गुन्हा दाखला झाला आहे. घटनास्थळी सहाय्यक पोलिस निरीक्षक अनिल चौधरी अधिक तपास करीत आहेत.
वडीलांनीही केला होता खून
संशयित आरोपी विनायकचे वडील शंकर यांनाही गावातील एका व्यक्तीच्या खूनप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा झाली होती. दोन वर्षापूर्वी एस.टी.अपघात त्यांचा मृत्यू झाला. विनायककडून आईचा खून झाल्यानंतर त्याच्या वडीलांकडून झालेल्या खूनाची ग्रामस्थांत चर्चा सुरू आहे.