धामणेत शेतीच्या वादातून सख्या चुलत भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 07:17 PM2020-11-27T19:17:41+5:302020-11-27T19:20:52+5:30
kolhapur, Police, murder गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
उत्तूर : गेल्या दहा-बारा वर्षापासून शेतजमिनीच्या वादातून दोन सख्या चुलत भावात शेतात वादावादी होवून होवून झालेल्या हाणामारीत शिवाजी परसू सावंत (वय ५५) यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणातील आरोपी संजय महादेव सावंत (वय ५२) हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. सकाळी दहाच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे गावात खळबळ उडाली आहे.
अधिक माहिती अशी, शिवाजी परसू सावंत व संजय महादेव सावंत यांच्यात पिपळा सकल मळा नावाच्या शेतातील गट नं. ६१० (अ) मध्ये वाटणीच्या कारणावरुन वाद आहे. त्याबाबत न्यायालयात खटला सुरू होता.
दरम्यान, शुक्रवारी (२७) सकाळी शिवाजी परसू सावंत हे सकाळी पिंपळा सकल मळा शेतात जनावरे घेवून गेले होते. यावेळी शेतीच्या बांधावरील झाडे तोडल्याचा जाब विचारला असता शिवाजी व संजय यांच्यात जोरदार हाणामारी झाली.
यामध्ये संजयने शिवाजी यांचे छातीवर टोकदार, धारदार हत्याराने भोसकून त्यास गंभीर जखमी केले. यामध्ये शिवाजी यांचा जागीच मृत्यू झाला. शिवाजी यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे असा परिवार आहे. खून झाल्याचे समजताच शेताकडे ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
मी व माझा सख्खा चुलत भाऊ शिवाजी यांच्यात मारामारी झाल्याचे सांगून आरोपी संजय हा स्वत:हून पोलिसात हजर झाला आहे. मात्र, संजयच्या डोक्याला व हातास मार लागल्याने पोलिसांनी त्याला उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून पुढील उपचारासाठी गडहिंग्लज उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले आहे.
घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस उपनिरीक्षक बालाजी भांगे यांनी भेट देवून पाहणी केली. याबाबत शिवाजी यांचा भाऊ पांडुरंग परसू सावंत यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे.
कोयता, टोकदार शस्त्राची नळी
घटनास्थळी कोयता, टोकदार शस्त्र ठेवण्यासाठी वापरण्यात आलेली नळी, मिरची पूड दिसून आली. त्यामुळे खून हा पूर्वनियोजित असल्याची चर्चा घटनास्थळी होती.
सव्वा एकर शेतीचा वाद
दोन सख्या चुलत भावांमध्ये १ एकर १४ गुंठे जमीनीसंदर्भात न्यायालयीन वाद सुरू आहे. दिवाणी न्यायालय आजरा, जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्याकडे असलेल्या दाव्याचा निकाल संजय यांच्या बाजूने लागला. त्याविरोधात शिवाजी यांनीही विभागीय आयुक्त पुणे यांच्याकडे दावा दाखल केला होता. त्याचा निकाल शिवाजी यांच्या बाजूने लागला. हा राग मनात धरून संजय याने खून केला.
वादाचा शेवट खून
जमीनसंदर्भात तंटामुक्त, पोलिस ठाणे याठिकाणी अनेकवेळा बैठका झाल्या. पण दोघांची ताठर भूमिका असल्याने वाद मिटलेला नव्हता.
लाकडे कापणारे पळून गेले
शिवाजी यांनी वादग्रस्त शेतजमीनीतील लाकडे व्यापाऱ्यांना विकली होती. गेली दोन दिवस लाकूड कापणी सुरू होती. पावणेदहाच्या सुमारास शेतात खून झाल्याचे समजताच संबंधित लाकूड कापणी करणारी मंडळी भितीने पळून गेली.
संपत्तीच्या वादातून दुसरा खून
२० वर्षापूर्वी संपत्तीच्या वादातून चिमणे (ता. आजरा) येथे सख्या भावात जमिनीच्या वादातून खून झाला होता. तालुक्यातील हा दुसरा सख्या चुलत भावात झालेला खून आहे.