शियेतील तृतीयपंथीचा मृत्यू नव्हे खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:26 AM2021-07-31T04:26:06+5:302021-07-31T04:26:06+5:30
शिये : शिये ( ता. करवीर ) येथील सतीश पवार ऊर्फ देवमामा यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून ...
शिये
: शिये ( ता. करवीर ) येथील सतीश पवार ऊर्फ देवमामा यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने करून त्यांना न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी महाकाली तृतीयपंथी देवदास देवदासी संघटनेच्यावतीने शिरोली एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक किरण भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील विविध भागातून तृतीयपंथी जमा झाले होते.
निवेदनात म्हटले आहे, सतीश पवार ( देवमामा ) हे दहा - बारा वर्षांपासून शिये गावचे रहिवासी आहेत. २१ जुलै रोजी त्यांचा संशयास्पद मृत्यू झाला होता. त्यावेळी त्यांच्या व देवाच्या जगावरती असणारे सुमारे चाळीस तोळे दागिने चोरीला गेले आहेत. त्यामुळे त्यांचा मृत्यू नैसर्गिक नसून, हा घातपात असल्याची शंका आहे. यापूर्वीही त्यांच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला होता. त्यामुळे आत्ता चोरीच्या उद्देशानेच आलेल्यांमुळे देवमामांना जीव गमवावा लागला आहे. त्यांचा घातपात झाला असल्याचे आमचे ठाम मत आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून देवमामांना न्याय मिळवून द्यावा, अन्यथा महाकाली तृतीयपंथी देवदास देवदासी संघटनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी संघटनेच्या अध्यक्ष गीता मोमीण, उपाध्यक्ष सपना मोरे, सचिव नेहा आत्तार, संघटक सुहास मोहिते, ऋतुजा पाटील, सुनील पाटोळे, नयना शिंदे, शिवाजी आळवेकर, आरती भंडारे, मयुरी आळवेकर उपस्थित होते.
फोटो : ३० शिरोली निदर्शने
सतीश पवार ऊर्फ देवमामा यांच्या मृत्यू प्रकरणाचा तपास योग्य पद्धतीने होण्याची मागणी करत एमआयडीसी पोलीस ठाण्यात जमलेले तृतीयपंथी .
.............................................................................................