बांधाच्या वादावरून सख्ख्या भावाचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:23 AM2021-02-14T04:23:55+5:302021-02-14T04:23:55+5:30
कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे शेताच्या बांधाच्या वादावरून दोन सख्ख्या भावात किरकोळ वाद झाला. यात विलास केशव भोसले ...
कोपार्डे : आडूर (ता. करवीर) येथे शेताच्या बांधाच्या वादावरून दोन सख्ख्या भावात किरकोळ वाद झाला. यात विलास केशव भोसले व यशवंत केशव भोसले (वय ५८) यांच्यात धक्काबुक्की झाली. काही कळण्याच्या आत यशवंत जमिनीवर कोसळले. उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथे रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन जात असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांत झाली आहे.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, यशवंत व विलास या भावांची आडूर येथील आंब्याचा माळ नावाच्या परिसरात शेती आहे. गेेल्या दोन महिन्यांपासून दोघांत वाटणी केलेल्या बांधावरून वाद होता. यशवंतचा मुलगा सागर याने शुक्रवारी सायंकाळी चुलता विलासला उद्या नातेवाईक आल्यानंतर हद्दीप्रमाणे दगडी नंबर टाकूया, असे सांगितले.
शनिवारी सकाळी आठच्या दरम्यान विलास, यशवंत व मध्यस्थी नातेवाईक
बाजीराव सूर्यवंशी (आडूर) व बाळासाहेब हावलदार (बहिरेश्वर) यांच्यासह शेतात आले. येथे मध्यस्थासमोरच विलास भोसले वाटणीप्रमाणे शेताच्या बांधावर सिमेंटचे खाब हद्दीवर कायम करत होते. यावरून यशवंत व विलास यांच्यात वादाला सुरुवात झाली. दरम्यान, विलासचा मुलगा अतुलही येथे आला. या तिघामध्ये धक्काबुक्की सुुरू झाली. विलास व त्याचा मुलगा अतुल यांनी यशवंतला काठीने मारहाण केली. जखमी झालेल्या यशवंतला खासगी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले, पण त्यांचा रक्तदाब वाढल्याने कोल्हापूर येथे उपचारासाठी कोल्हापूर येथे शासकीय रुग्णालयात हलविले. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. करवीर पोलीस उपनिरीक्षक अरविंद कांबळे यांनी घटनास्थळाला भेट देत पंचनामा केला. संशयित विलास व मुलगा अतुल भोसले यांंच्यावर गुन्हा नोंदवण्याचे काम सुरू होते.
.............
कुटुंबच अडचणीत
विलासच्या एका मुलाचे सहा महिन्यांपूर्वी निधन झाले. आता यशवंतच्या मृत्यूने पोलिसांच्या जाळ्यात हे बाप-लेक अडकल्याने सर्व कुटंबच अडचणीत आले आहे.
१३ यशवंत भोसले