इचलकरंजीत सामाजिक कार्यकर्त्याचा खून, धारधार हत्याराने घरासमोरच केले वर्मी घाव
By ऑनलाइन लोकमत | Published: February 9, 2022 12:16 PM2022-02-09T12:16:30+5:302022-02-09T12:17:30+5:30
पूर्ववैमनस्यातून हल्ला झाल्याचा संशय
इचलकरंजी : येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश अन्नापा गडगे (वय 55, रा स्वामी अपार्टमेंट, इचलकरंजी) यांचा मंगळवारी रात्री उशिरा राहत्या घरासमोर निर्घृण खून करण्यात आला. त्यांच्या मानेवर चाकू सारख्या धारधार हत्याराने एकच वर्मी घाव बसला असून, त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.
हल्ल्याचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी पूर्व वैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
याबाबत घटनास्थळ व पोलिसातून मिळालेली माहिती अशी, गडगे हे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन संघटनेचे माजी अध्यक्ष होते, तर भ्रष्टाचार विरोधी जनक्रांती आघाडीचे ते संस्थापक अध्यक्ष होते. तसेच माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणूनही ते काम करीत होते.
मंगळवारी रात्री उशिरा नेहमीच्या सवयीप्रमाणे भटक्या कुत्र्यांना बिस्कीट घालण्यासाठी ते घरासमोर थांबले होते. त्यावेळी अचानक हल्लेखोराने त्यांच्यावर हल्ला केला. चाकू सारख्या धारदार शस्त्राने त्यांच्या मानेवर वार केला. त्यात त्यांना गंभीर इजा झाली. त्यावेळी आरडाओरड ऐकून परिसरात थांबलेले शेजारी त्यांच्या दिशेने आले. त्यामुळे हल्लेखोर पळून गेला.
घटनास्थळावरील नागरिकांनी त्यांना उपचारासाठी म्हणून आयजीएम रुग्णालयात नेले. परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याचे वैदयकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. ही माहिती समजताच घटनास्थळी व आयजीएम रुग्णालयात गर्दी झाली होती. घटनास्थळी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी भेट दिली.