कोल्हापूर: त्याने ठेवला लग्नाचा प्रस्ताव, तीन मुले असल्याने तिने दिला नकार; रागातच केले सपासप वार
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 12:19 PM2022-10-03T12:19:18+5:302022-10-03T15:35:41+5:30
राकेशने आपल्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला; पण, त्या लग्नाला नकार देत होत्या.
कोल्हापूर : अनैतिक संबंधातून तरुणाने महिलेचा धारदार कोयत्याने गळ्यावर सपासप वार करून निर्घृण खून केल्याची घटना कसबाबावडा लाईन बाजार परिसरात शहाजीनगरात रविवारी घडली. कविता प्रमोद जाधव (वय ४४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. भर मध्यवस्तीत दुपारी घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली.
संशयित आरोपी राकेश शामराव संकपाळ (वय ३२, रा. शहाजीनगर) हा स्वत:हून पोलीस मुख्यालयातील ‘एलसीबी’ मध्ये हजर झाला. त्याला पोलिसांनी अटक केली. लग्नास नकार दिल्याने रागाच्या भरात तिचा खून केल्याची कबुली संशयिताने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
घटनास्थळी व पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कविता जाधव ही कसबा तारळे येथे राहते. त्यांना दोन मुली व एक मुलगा असून पतीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले आहे. राधानगरी येथे मावसभावाच्या फुटवेअर दुकानात त्या कामास होत्या, शिवणकामही करून उदरनिर्वाह करत होत्या. नात्यातील अविवाहीत राकेश संकपाळ याच्याशी त्यांचे सूत जुळले. दोघांच्या संबधांची नातेवाईकांना कल्पना होती. राकेशने तिला आपल्यासोबत लग्न करण्याचा तगादा लावला; पण, त्या लग्नाला नकार देत होत्या.
रविवारी सकाळी संशयित राकेशने आपल्या आई- वडिलांना देवदर्शनाला गावी पाठवले. भाऊ नेहमीप्रमाणे नोकरीला गेला. त्यावेळी कविता ही मावसभावासोबत राकेशच्या घरी आल्या. त्यानंतर भाऊ परत तारळेला निघून गेला. दुपारी राकेशने कविताला पुन्हा लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तिने तीन मुले असल्याने लग्नास नकार दिला, दोघांत वादावादी झाली. रागातच राकेशने घरातील धारदार कोयत्याने तिच्या गळ्यावर व मानेवर सपासप वार केले. त्यात ती जागीच ठार झाली.
घटनेनंतर संशयित आरोपी राकेश संकपाळ स्वत:हून नजीकच्या पोलीस मुख्यालयातील स्थानिक गुन्हे अन्वषेण शाखेच्या कार्यालयात हजर झाला, त्याने खून केल्याची कबुली दिली. स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पो.नि. संजय गोर्ले, सहा.पो.नि. किरण भोसले, शाहुपूरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेश गवळी आदींनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाचे दृश्य विदारक होते.
भिंतीवर रक्ताच्या चिळकांड्या
कविता हिच्या गळ्यावर कोयत्याचे सहा तर मानेवर एक वर्मी घाव होता. रक्ताच्या चिळकांड्या खोलीतील भिंतीवर तसेच राकेशच्या कपड्यावर उडल्या होत्या. त्याच अवस्थेत तो पोलिसांत हजर झाला.
मुलीला भेटीला जाण्यासाठी पोळ्या केल्या; पण...
कविताची मुलगी महागाव (ता. गडहिंग्लज) येथे व्यावसायिक शिक्षण घेते. तिला भेटायला जाण्यासाठी कविताने रविवारी लवकर उठून पोळ्या केल्या, त्या घेऊन त्या कसबा तारळेतून कोल्हापुरात आल्या. कदाचित कविता व राकेश दोघेही महागावला जाणार होते; पण, तोपर्यंत अनर्थ घडला.
कडी घालून घरातून बाहेर पडला
खून केल्यानंतर मृतदेह तेथेच टाकून घराच्या दरवाजाला कडी लावून तो बाहेर पडला. कडी लावताना त्याच्या हाताचे रक्तही कडीला लागले होते.