प्रेयसीला त्रास दिल्याचा काढला वचपा, कोल्हापुरात निर्जन माळावर तरुणाचा निर्घृण खून
By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2022 04:29 PM2022-06-27T16:29:07+5:302022-06-27T17:40:30+5:30
संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या रागातून नियोजनबध्द कट रचून संकेतला फोन करून बोलावले व माळरानावर काळोखात नेऊन चाकूने त्याच्यावर सपासप वार केले.
कोल्हापूर : साळोखेनगर परिसरात कोपार्डेकर हायस्कूलसमोरील माळावर कट करून तरुणावर चाकूने सपासप वार करून त्याचा निर्घृण खून करण्यात आला. संकेत सर्जेराव पाटील (वय १९, रा. अपंग गृहनिर्माण सोसायटी, शिवगंगा कॉलनी, साळोखेनगर, कोल्हापूर. मूळ गाव- बस्तवडे, ता. कागल) असे त्याचे नाव आहे. प्रेयसीचा पाठलाग करून तिला वारंवार त्रास दिल्याच्या रागातून शनिवारी मध्यरात्री तिघांनी चाकूने भोसकून हा खून केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तिघांना अवघ्या काही वेळेत अटक करून खुनाचा उलगडा केला.
शिवराज ऊर्फ दाद्या चंद्रकांत बंडगर (वय २२), प्रतीक विजय कांबळे (१९) व रोहित नामदेव कांबळे (१९, तिघेही रा. वाल्मिकी नगर, आंबेडकर आवास, साळोखेनगर) अशी अटकेतील संशयितांची नावे आहेत.
संकेत पाटील हा उद्यम नगरात कामाला होता. लहानपणापासून तो शिवगंगा कॉलनीत चुलते दिलीप रंगराव पाटील यांच्याकडेच राहत होता. चुलते माजी सैनिक असून ते मध्यवर्ती एस.टी. स्टॅन्डवर सुरक्षा रक्षक आहेत. शनिवारी दुपारी ते नेहमीप्रमाणे नोकरीवर गेले होते, तर त्याची चुलती पंढरपूर वारीला गेली आहे. सायंकाळी ते संकेतशी फोनवर बोलले. संकेत कामावरून रात्री घरी आला व जेवून घराला कुलूप लावून दुचाकीवरून बाहेर पडला. रविवारी सकाळी माळावर फिरायला गेलेल्या नागरिकांना संकेतचा छिन्नविछिन्न अवस्थेतील मृतदेह आढळला. संकेतला साथीदारांनी माळावर बोलावून धारदार शस्त्रांनी सपासप वार करून जागीच ठार केले.
घटनास्थळी अपर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण, जुना राजवाडाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे यांच्यासह पोलिसांनी येऊन परिसराची पाहणी केली. घटनास्थळी त्याच्या वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटणारा होता. संकेतची आई घरी असते, तर वडील हमिदवाडा साखर कारखान्यात नोकरीस असून मोठा भाऊ नेव्हीत आहे.
पोलिसांनी गतीने तपास केला. स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने शिवराज बंडगर याला सुभाषनगर ते आर. के. नगर रस्त्यावर, तर प्रतीक कांबळे व रोहित कांबळे या दोघांना जुना राजवाडा पोलीस पथकाने अटक केली.
नियोजनबध्द कट, सपासप केले वार
संकेत हा प्रतीकच्या प्रेयसीच्या मागे लागला होता. तिचा वारंवार पाठलाग करत होता. त्या रागातून प्रतीक, शिवराज आणि रोहित यांनी संगनमताने नियोजनबध्द कट रचून संकेतला फोन करून बोलावले व माळरानावर काळोखात नेऊन, मध्यरात्री तिघांनी एकाच चाकूने त्याच्यावर सपासप वार केले. पोटावर, खांद्यावर आठ ते नऊ खोलवर वार केल्याने मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत टाकून संशयितांनी पलायन केले.
सीसीटीव्ही फुटेज, श्वानाचा मार्ग
घटनास्थळ परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास संशयित दोघांचा वावर असलेले सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना मिळाले. पोलीस श्वान पथकानेही वाल्मिकी नगर दिशेने मार्ग दाखवला. त्यातून आरोपींना गजाआड केले.