Kolhapur: पोर्ले तर्फ ठाणे येथे तरुणाचा निर्घृण खून, सैन्य दलातील जवानासह तिघांनी केले वार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:42 AM2024-05-20T11:42:49+5:302024-05-20T11:43:06+5:30
आईने हात जोडले, तरीही दया नाही
कोल्हापूर/पोर्ल तर्फ ठाणे : पोर्ले तर्फ ठाणे (ता. पन्हाळा) येथे निटवडे रोडवर पूर्ववैमनस्यातून सैन्य दलातील जवानाने दांडक्याने आणि अवजड हत्याराने मारहाण करून विकास आनंदा पाटील (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याचा खून केला. रविवारी (दि. १९) सायंकाळी सातच्या सुमारास शेतातील वस्तीवरून जनावरांच्या धारा काढून घरी जाताना विकास याच्या आईसमोरच खुनी हल्ल्याची घटना घडली. हल्लेखोर युवराज शिवाजी गायकवाड (वय ४०, रा. पोर्ले तर्फ ठाणे) याच्यासह अनोळखी दोघे घटनास्थळावरून पसार झाले.
घटनास्थळ आणि सीपीआरमधून मिळालेल्या माहितीनुसार, सैन्य दलात पंजाबमध्ये कार्यरत असणारा युवराज गायकवाड आणि पोर्ले तर्फ ठाणे येथे शेती करणारा विकास पाटील या दोघांमध्ये वाद होता. फेब्रुवारी महिन्यात दोघांमध्ये हाणामारी झाली होती. त्यानंतर ड्यूटीवर गेलेला युवराज शनिवारी रात्रीच सुटीवर गावी आला होता. रविवारी सायंकाळी शेतातील कामे आणि जनावरांच्या धारा काढून विकास आईला दुचाकीवर घेऊन घरी निघाला होता. निटवडे रोडवर कमानीजवळ वाटेत थांबलेला युवराज आणि अनोखळी दोघांनी विकासची दुचाकी अडवली. खाली पाडून त्याच्यावर काठी आणि अवजड हत्याराने हल्ला चढवला. अडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या आईला ढकलून हल्लेखोरांनी विकासला बेदम मारहाण केली. परिसरातील ग्रामस्थांची गर्दी वाढताच हल्लेखोरांनी कारमधून पलायन केले.
गंभीर जखमी अवस्थेतील विकास याला त्याचे मित्र विश्वास पाटील आणि विकास भोपळे या दोघांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. काही वेळातच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. विकास याचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईक आणि मित्रांनी सीपीआरच्या अपघात विभागासमोर गर्दी केली. दरम्यान, पन्हाळा पोलिसांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये पोहोचून माहिती घेतली. रात्री उशिरा याबाबत पन्हाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्याचे काम सुरू होते.
कट रचून हल्ला
तीन महिन्यांपूर्वी झालेल्या वादानंतर युवराज याने कट रचून विकासचा काटा काढल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू होती. हल्ल्यानंतर युवराज गायकवाड याच्यासह दोन साथीदारांनी पलायन केले. अन्य दोघांनी तोंडाला मास्क लावले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. हल्लेखोरांची ओळख पटवून त्यांच्या अटकेसाठी पथक रवाना झाल्याची माहिती पन्हाळा पोलिसांनी दिली.
नाजूक संबंधातून वाद?
युवराज आणि विकास यांच्यात नाजूक संबंधातून वाद होता. यातून त्या दोघांमध्ये अनेकदा संघर्ष झाला होता, अशी चर्चा गावात सुरू होती. मात्र, हल्ल्याचे नेमके कारण संशयितांच्या अटकेनंतरच स्पष्ट होईल. फिर्यादीचा जबाब आणि संशयितांच्या चौकशीतून खुनाचे कारण समोर येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
आईने हात जोडले, तरीही दया नाही
अंगाने मजबूत असलेल्या विकासवर तिघांनी एकदम हल्ला केला. रस्त्यावर कोसळलेल्या विकासला वाचवण्यासाठी त्याची आई हल्लेखोरांना थांबवण्याचा प्रयत्न करीत होती. तिने हात जोडून गयावया केली, तरीही हल्लेखोरांना दया आली नाही. काही लोकांनी मारहाण थांबवण्याचा प्रयत्न केला. हल्लेखोर त्यांच्याही अंगावर धावून गेले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली.
वाटेत पाणी प्यायला
अत्यवस्थ अवस्थेतील विकास याला मित्रांनी दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. वाटेत त्याने दुचाकी थांबवून पाणी मागितले. पाणी पिल्यानंतर तो पुन्हा दुचाकीवर बसला. मात्र, सीपीआरमध्ये पोहोचेपर्यंत त्याची शुद्ध हरपली होती.