Crime News: धड मिळाले.. शिर नाही..! आर्थिक व्यवहारातून बीडच्या अधिकाऱ्याचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2022 02:44 PM2022-03-16T14:44:54+5:302022-03-16T15:41:51+5:30
शिर धडावेगळे करून नांगनूर येथील जुन्या बंधाऱ्यानजीक एका दगडाला तारेने बांधून तो हिरण्यकेशी नदीत फेकून दिले आणि नांगनूरच्या पश्चिमेला असणाऱ्या निलजी बंधाऱ्याजवळ नदीच्या पात्रात शीर फेकून देऊन खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
गडहिंग्लज : आर्थिक व्यवहारातून अपहरण केलेल्या बीड जिल्ह्यातील ऊसतोडणी मजूर पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्याचा खून झाल्याचे उघडकीस आले आहे. केज पोलिसांनी अवघ्या तीन दिवसात या खुनाचा छडा लावला. सुधाकर उर्फ सुदाम हनुमंत चाळक (वय ५८, रा. लव्हुरी, ता.केज,जि.बीड) असे मृताचे नाव आहे.
याप्रकरणी तुकाराम मुंढे (रा. धारूर, जि.बीड), रमेश मुंढे (वडवणी, जि. बीड), दत्तात्रय देसाई (रा. कडगाव, ता. भुदरगड) यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांची न्यायालयाने १७ मार्चअखेर पोलीस कोठडीत रवानगी केली आहे.
केज पोलिसातून मिळालेली माहिती अशी, सुधाकर चाळक हे केज येथील महालक्ष्मी साखर कारखान्यात कामगार पुरवठा अधिकारी म्हणून काम पाहत होते. त्यांनी ऊसतोडणी मजुरांच्या टोळ्या पुरवण्यासाठी दत्तात्रय देसाई यांच्याकडून काही रक्कम घेतली होती. तथापि,चाळक यांनी देसाई यांना ऊसतोडणी मजुरांचा पुरवठा केला नाही. तसेच त्यांचे पैसे देखील परत दिले नाहीत. त्यामुळे देसाई यांनी तुकाराम व रमेश यांच्या मदतीने सुधाकर यांना कडगावला बोलवून घेतले. त्यानंतर त्यांना काही दिवस कडगाव पासून ५ ते ६ किलोमीटर अंतरावरील जंगलातील निर्जनस्थळी असणाऱ्या एका मंदिरात ठेवले होते.
दरम्यान, सुधाकर यांना कर्नाटक-महाराष्ट्राच्या सीमेवरील खणदाळ याठिकाणी आणून ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांच्याच मोबाइलवरून सुधाकरची मुले अक्षय आणि विशाल यांना फोन करून १२ लाख रुपये घेऊन संकेश्वर येथे येण्यास सांगितले. त्यासाठी सुधाकरला बेदम मारहाण करून त्यांच्या रडण्याच्या आणि विव्हळण्याचा आवाजही मुलांना ऐकवला आणि पैसे आणले नाहीत तर वडिलांना जीवे मारू अशी धमकीही दिली.
दरम्यान, मंगळवारी (२८) रोजी रात्री सुधाकरला पुन्हा बेदम मारहाण केली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतदेह इंडिका कारमध्ये ठेवला. त्यानंतर त्यांचे शीर धडावेगळे करून नांगनूर येथील जुन्या बंधाऱ्यानजीक एका दगडाला तारेने बांधून तो हिरण्यकेशी नदीत फेकून दिले आणि नांगनूरच्या पश्चिमेला असणाऱ्या निलजी बंधाऱ्याजवळ नदीच्या पात्रात शीर फेकून देऊन खुनाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली अनिल मंदे, दिलीप गीते, संतोष गीते व जीवन करंवदे यांच्या पथकाने या खुनाचा छडा लावला. या घटनेमुळे बीडसह कोल्हापूर जिल्ह्यातही खळबळ उडाली आहे.
धड मिळाले.. शिर नाही..!
सोमवारी (१४) सायंकाळी नांगनूर बंधाऱ्यानजीक सुधाकर यांचे दगडाला तारेने बांधलेले धड मिळाले. त्यानंतर मंगळवारी (१५) आरोपीने दिलेल्या माहितीनुसार कोल्हापूरहून पाणबुड्या मागवून निलजी बंधाऱ्याच्या दोन्ही बाजूला त्यांच्या शिराचा दिवसभर शोध घेण्यात आला. मात्र, त्याला यश आले नाही. त्यामुळे आरोपी दिशाभूल करीत असून गुन्ह्यात आणखी कांही जणांचा सहभाग असल्याचा पोलिसांना संशय आहे.
दहा वषार्पासून मैत्री
दहा वषार्पूर्वी आरोपी दत्तात्रय देसाई हे देखील केज येथील एका साखर कारखान्यात नोकरीला होते. त्यावेळीपासून सुधाकर आणि तुकाराम व रमेश यांच्याशी त्याचे मैत्रीचे संबंध होते. दरम्यान, त्याने गावाकडे ट्रॅक्टर घेवून परिसरातील कारखान्यांना ऊसपुरवठा करण्याचा व्यवसाय सुरू केला. त्यासाठी तो बीडवरून मजुरांच्या टोळ्या आणत होता. परंतु, पैसे घेवूनही मजुरांचा पुरवठा न केल्यामुळेच तुकाराम व रमेश यांच्या मदतीने त्याने सुधाकरचा थंड डोक्याने खून केल्याचा पोलिसांना संशय आहे.
अवघ्या तीन दिवसात छडा
सुधाकर यांच्या मोबाईलवरून त्यांच्या मुलांना आलेल्या कॉलच्या नोंदी आणि अपहरणाच्या काळात तुकाराम व रमेश यांच्यासोबत सुधाकरला पाहिलेल्या एका साक्षीदाराच्या मदतीने बीड जिल्हा पोलिस प्रमुख आर राजा, सहाय्यक पोलिस अधिक्षक पंकज कुमावत, केजचे पोलिस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेश पाटील यांनी मोठ्या कौशल्याने अवघ्या तीन दिवसात या खूनाचा छडा लावला.
घटनाक्रम :
- १६ फेब्रुवारी - राहत्या घरातून सुधाकर बेपत्ता.
- २५ फेब्रुवारी - वडील बेपत्ता झाल्याची मुलाची फिर्याद.
- २८ फेब्रुवारी - अज्ञाताविरूद्ध अपहरणाचा गुन्हा दाखल.
- २८ फेब्रुवारी - सुधाकर यांचा खून
- १४ मार्च - नांगनूर बंधाऱ्यानजीक सुधाकर यांचे धड सापडले.
- १५ मार्च - निलजी बंधाऱ्यानजीक सुधाकर यांच्या शीरेचा शोध