Kolhapur: शियेत बालिकेचा खून: पोलिस दलातील बेली श्वानाने अवघ्या दहा मिनिटांत शोधला मृतदेह
By उद्धव गोडसे | Published: August 23, 2024 02:14 PM2024-08-23T14:14:42+5:302024-08-23T14:15:10+5:30
पोलिस अधीक्षकांकडून श्वान पथकाचे कौतुक, बेलीने आजवर खुनाच्या तीन गुन्ह्यांची केली उकल
उद्धव गोडसे
कोल्हापूर : पीडित मुलगी बेपत्ता झाल्यापासून १५ तास स्थानिक नागरिक आणि पोलिसांकडून तिचा शोध सुरू होता. रात्रभर परिसर पालथा घालूनही तिचा शोध लागत नव्हता. मात्र, गुरुवारी (दि. २२) दुपारी श्वानपथक पोहोचल्यानंतर अवघ्या दहा मिनिटांत बेली नावाच्या श्वानाने मृतदेहाचा छडा लावला. यामुळे गुन्हा उघडकीस आला आणि संशयित आरोपीचा शोध घेण्यात पोलिसांना मोलाची मदत झाली.
गुरुवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास श्वान पथकाचे प्रमुख पोलिस हवालदार प्रदीप माने यांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या अधिका-यांचा कॉल आला. तातडीने श्वान पथकासह शिये येथे पोहोचण्याचा आदेश मिळताच बेली श्वानासह हवालदार माने, प्रदीप सुर्वे, कॉन्स्टेबल कुणाल झेंडे आणि चालक राजू नाईक घटनास्थळी पोहोचले. पावणेबाराला घटनास्थळी पोहोचल्यानंतर श्वान पथकातील कर्मचा-यांनी परिस्थितीचा अंदाज घेतला.
काही मिनिटांत बेली श्वानाला वाहनातून उतरवून पीडित मुलीच्या घरात घेऊन गेले. मुलीच्या कपड्यांचा वास देताच बेली श्वान घरापासून दक्षिणेच्या दिशेने निघाले. उसाच्या शेतातून सुमारे ८०० मीटर अंतरावर असलेल्या ओढ्याच्या काठावर पोहोचताच तिने भुंकून इशारा केला. पोलिसांनी ओढ्यात पाहताच पीडित मुलीचा मृतदेह आढळला. अवघ्या दहा मिनिटांत श्वानाने मृतदेहाचा शोध घेऊन आपले काम फत्ते केले.
बेलीने केला तीन खुनांचा उलगडा
कोल्हापूर पोलिस दलाकडील श्वान पथकात गेल्या चार वर्षांपासून बेल्जियम शेफर्ड जातीची बेली नावाची मादी श्वान कार्यरत आहे. चंदीगड येथे एक वर्षाचे प्रशिक्षण पूर्ण करून ती कोल्हापूर पोलिस दलात दाखल झाली. तिचे वय पाच वर्षांचे आहे. गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करण्याची तिची खासियत आहे. पेठ वडगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत शेतातील महिलेचा मृतदेह, शाहूवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सावत्र बापाने केलेला मुलाचा खून आणि शिये येथील बालिकेच्या खुनाचा उलगडा करण्याचे काम तिने केले आहे. तसेच अनेक घरफोडीच्या गुन्ह्यांचा तपास करण्यात तिने पोलिसांना मदत केली.
उल्लेखनीय काम
गंभीर गुन्ह्याचा उलगडा करण्यात बेली श्वानाने पोलिसांना मोलाची मदत केली. याबद्दल पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी श्वान पथकाचे विशेष कौतुक केले. या पथकातील प्रमुख प्रदीप माने यांच्यासह कर्मचारी प्रदीप सुर्वे, कुणाल झेंडे, राजू नाईक, अरुण पाटील, राजू डाके, अनिल धणे, दीपक अष्टेकर, भगवान जाधव, पृथ्वीराज निंबाळकर आणि राहुल माळी हे या पथकात कार्यरत असतात.