Kolhapur Crime: अनैतिक संबंधात अडथळा, सुपारी देवून पतीचा खून; पत्नीसह आठ जणांना जन्मठेप
By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2023 07:33 PM2023-01-24T19:33:50+5:302023-01-24T19:36:53+5:30
प्रेमसंबंधातून खुनाचा कट
कोल्हापूर : अनैतिक संबंधात अडथळा ठरत असलेल्या पतीचे अपहरण करून निर्घृण खून केल्याप्रकरणी पत्नी आणि तिच्या प्रियकरासह आठ जणांना जिल्हा सत्र न्यायाधीश (३) एस. एस. तांबे यांनी मंगळवारी (दि. २४) जन्मठेप आणि प्रत्येकी ५० हजार रुपयांची शिक्षा सुनावली. पत्नीसह अकरा आरोपींनी नितीन बाबासाहेब पडवळे (वय ३५, रा. लाइन बाजार, कसबा बावडा, कोल्हापूर) यांचा १२ जानेवारी २०११ रोजी मानोलीच्या जंगलात शिर धडावेगळे करून खून केला होता. या गुन्ह्यातील एका आरोपीचा दोन वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे, तर दोन आरोपी अद्याप फरार आहेत. शिक्षा झालेल्या आरोपींमध्ये दोन महिलांचा समावेश आहे.
रवि रमेश माने (वय ३८), दिलीप व्यंकटेश दुधाळे (४०), मनेश सबण्णा कुचकोरवी (४२, तिघे रा. माकडवाला वसाहत, कावळा नाका,), विजय रघुनाथ शिंदे (४०, रा. नालासोपारा, ठाणे), किशोर दोडाप्पा माने (३२, रा. इंदिरानगर झोपडपट्टी, साळोखेनगर), आकाश उर्फ अक्षय सीताराम वाघमारे (३१, रा. राजारामपुरी), लीना नितीन पडवळे (४१, रा. लाईन बाजार, कसबा बावडा) आणि गीतांजली वीरुपाक्ष मेनशी (४१, रा. शांतीनगर, पाचगाव) या आठ जणांना जन्मठेपेची शिक्षा झाली.
तर याच गुन्ह्यातील सतीश भीमसिंग वडर (रा. सायबर चौक, राजारामपुरी) आणि इंद्रजित उर्फ चिल्या रमेश बनसोडे (रा. कावळा नाका) हे दोघे फरारी आहेत. मृत पडवळे याचे शिर धडावेगळे करणारा अमित चंद्रसेन शिंदे (रा. विक्रमनगर) याचा दोन वर्षांपूर्वीच मृत्यू झाला.
प्रेमसंबंधातून खुनाचा कट
लीना पडवळे आणि रवि माने या दोघांचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधात अडथळा ठरत असलेला लीनाचा पती नितीन याचा खून करण्याची सुपारी या दोघांनी कावळा नाका परिसरात दिलीप दुधाळे याला दिली. आरोपींनी १२ जानेवारी २०११ रोजी आर. के. नगर येथील खडीचा गणपती मंदिर परिसरातून पडवळे याचे कारमधून अपहरण केले. त्यानंतर वाठार-बोरपाडळेमार्गे विशाळगड रोडवर मानोली गावच्या जंगलात वाघझरा येथे पडवळे याचे शिर धडावेगळे करून मृतदेह दरीत फेकला.
वारणा नदीत पुरावे नष्ट
धडावेगळे केलेले शिर, मृताचा शर्ट, मोबाइल, गुन्ह्यात वापरलेला चाकू कोडोली ते बच्चे सावर्डे मार्गावर वारणा नदीच्या बंधाऱ्यात फेकून दिला. मृताची दुचाकी, हॉकी स्टिक, चॉपर नदीपात्रात फेकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. शाहूवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तत्कालीन पोलिस निरीक्षक डी. एस. घोगरे यांनी तपास करून संशयितांवर आरोपपत्र दाखल केले.
२१ साक्षीदार तपासले
या गुन्ह्यात आठ आरोपींना अटक झाली. दोघे अजूनही फरार आहेत. मृत पडवळे याचे शिर धडावेगळे करणारा अमित शिंदे याचा काही वर्षांपूर्वीच मृत्यू झाला. सरकारी वकील एस. एम. पाटील यांनी न्यायालयात २१ आरोपी तपासले. उपलब्ध पुरावे, साक्षीदारांच्या साक्षी आणि सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरला.
कोर्ट, सीपीआरमध्ये गर्दी; तणाव
सर्व आरोपी गेल्या सहा-सात वर्षांपासून जामिनावर सुटले होते. यातील काही आरोपींचा गुन्हेगारी टोळ्यांमध्ये सहभाग होता. त्यांच्यावर अन्य गंभीर गुन्हेही दाखल आहेत. आरोपींना न्यायालयात हजर करण्यापूर्वी नातेवाइकांनी कोर्टाच्या आवारात गर्दी केली. शिक्षा सुनावल्यानंतर आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी सीपीआरमध्ये आणले. शिक्षेतील तीन आरोपी कावळा नाका येथील वसाहतीमधील असल्याने त्या परिसरातील तरुणांनी सीपीआरमध्ये मोठी गर्दी केली होती. पोलिस बंदोबस्त वाढवल्यामुळे सीपीआरच्या अपघात विभागाला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.