Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2024 02:10 PM2024-07-05T14:10:31+5:302024-07-05T14:12:02+5:30

मजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबातील हाताला आलेला मुलगा गेल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा

murder of Ichalkaranjit youth over horse cart race dispute in Kolhapur, three arrested | Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

Kolhapur: घोडागाडी शर्यतीच्या वादातून इचलकरंजीत युवकाचा निर्घृण खून, तिघांना अटक

इचलकरंजी : घोडागाडी शर्यतीच्या वादातून शहापूर येथील शाळेच्या पाठीमागे एका युवकाचा डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. सुशांत दीपक कांबळे (वय १८, रा. आसरानगर, इचलकरंजी) असे त्याचे नाव आहे. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेली ही घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी गतीने तपास करत तिघा संशयितांना अटक केली. या घटनेची नोंद शहापूर पोलिस ठाण्यात झाली आहे.

अतिश दत्तात्रय नेटके (१९, रा. सहकारनगर), आर्यन सरदार चव्हाण (२१, रा. गणेशनगर) व प्रदीप पारद यादव (२०, रा. जेकेनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. शहापुरातील विद्यामंदिर क्र. ४३ या शाळेच्या मागे गुरुवारी सकाळी व्यायामासाठी आलेल्या नागरिकांना मृतदेह आढळला. त्यांनी ही माहिती पोलिसांना दिली. पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांच्यासह पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तोंडावर, छातीवर व पाठीत धारदार शस्त्राने वार करून युवकाचा खून केल्याचे आढळले.

पोलिसांना घटनास्थळी सापडलेल्या मोबाइलवरून मृताची ओळख पटली. पंचनामा करून मृतदेह विच्छेदनासाठी आयजीएम रुग्णालयात हलविला. त्यानंतर शहापूर पोलिस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर (एलसीबी)च्या पथकाने मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. तपासामध्ये मोबाइल लोकेशनवरून संशयित कोल्हापुरातील राजाराम कॉलेजच्या इमारतीच्या मागील बाजूस असल्याचे समजले. त्यानुसार कारवाई करत संयुक्त पथकाने तिघा संशयितांना ताब्यात घेतले.

त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता अतिश व सुशांत हे एकमेकांचे मित्र होते. सुशांत हा एका मित्राच्या वाढदिवसासाठी जातो म्हणून सांगून बुधवारी (दि. ३) सायंकाळी घरातून बाहेर पडला होता. मात्र, वाढदिवस नसून तो संशयितांसोबत दारू पिण्यासाठी गेला होता. दारू पिऊन हे सर्व जण मोटारसायकलवरून शाळेजवळ आले. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात घोडागाडी शर्यतीच्या कारणावरून झालेला वाद तेथे पुन्हा उफाळून आला. त्यातून हा खून केला असल्याचे संशयितांनी कबूल केले. घटनास्थळी व आयजीएम रुग्णालय परिसरात गर्दी झाली होती.

आईला भोवळ

मजुरी करून संसाराचा गाडा चालविणाऱ्या कुटुंबातील हाताला आलेला मुलगा गेल्याने त्याच्या आईचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. त्यात आईला दोनवेळा भोवळही आली होती. सुशांतच्या पश्चात आई आणि एक मोठा भाऊ असा परिवार आहे.

Web Title: murder of Ichalkaranjit youth over horse cart race dispute in Kolhapur, three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.