हातकणंगलेतील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक पटेलचा खून, चारजण ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2022 12:27 PM2022-04-14T12:27:06+5:302022-04-14T12:27:31+5:30

दीपकचा खून १५ लाख रुपयाच्या खंडणीसाठी झाला असल्याचा संशय

Murder of missing timber trader Deepak Patel in Hatkanangle, four arrested | हातकणंगलेतील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक पटेलचा खून, चारजण ताब्यात

हातकणंगलेतील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक पटेलचा खून, चारजण ताब्यात

googlenewsNext

हातकणंगले : येथील बेपत्ता टिंबर व्यावसायिक दीपक हिरालाल पटेल (वय ३४) याचा राधानगरी तालुक्यातील पाट पन्हाळा येथे खून करून मृतदेह शेतात पुरून त्यावर भले मोठे दगड ठेवल्याचे बुधवारी उघडकीस आले. दीपकचा खून १५ लाख रुपयाच्या खंडणीसाठी झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला तब्बल अठरा दिवसानंतर या खुनाचा उलगडा करण्यात यश आले आहे. चार संशयिताना स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतल्यामुळे या खुनाला वाचा फुटली आहे.

स्थानिक गुन्हा शाखेचे एक पथक बुधवारी दुपारी दोन संशयिताना घेऊन राधानगरी पोलीस ठाण्यामध्ये पोहचले. येथील पोलीस निरीक्षक आप्पासाहेब कोळी यांच्यासह पोलीस कर्मचारी के. डी. लोकरे, सुरेश मेटील, डी. बी. पाटील गुन्हे शाखा पथकाच्या मदतीने पाटपन्हाळा या अभयारण्य क्षेत्रातील घटनास्थळी पोहचले. सायंकाळी साडेपाच वाजता पाटपन्हाळाच्या पूर्वेकडील दाट जंगल आणि गव्याचा वावर असलेल्या परिसरात दरी शेजारील शेतजमिनी मध्ये दीपक पटेलचा मृतदेह पुरून त्यावर दगड ठेवल्याच्या अवस्थेत पोलिसाना मिळून आला. स्थानिकांच्या मदतीने रात्री उशिरा मृतदेह ताब्यात घेऊन पोलीस पथक सीपीआर रुग्णालय कोल्हापूरकडे दाखल झाले.

येथील टिंबर व्यावसायिक दीपक हिरालाल पटेल हा शनिवार २६ मार्चपासून बेपत्ता आहे. त्यांचे १५ लाखाच्या खंडणीसाठी अपहरण केल्याचा संशय त्यांच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. अपहरण होण्यापूर्वी त्यांच्या घराची सलग तीन दिवस रेकी केली होती. त्यानंतर त्याचे अपहरण झाले. त्याला घेऊन जाणारी चारचाकी कर्नाटकातील कुर्ली -सौदलगा परिसरात बेवारस स्वरूपात मिळाली होती. त्या नंतर पोलीस तपासाची यंत्रणा गतिमान झाली होती.पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या आदेशाने हातकणंगले पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेकडून राधानगरी सह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तसेच कर्नाटकातील सीमाभाग पोलिसानी पिंजून काढला होता. परंतु अपहरणकर्त्याचा ठावठिकाणा लागत नव्हता.

१५ लाख रुपयांच्या खंडणीसाठी दीपकचे अपहरण झाल्यानंतर तपास पथकाने मोबाईल लोकेशनच्या आधारे त्याचा शोध घेतला होता. पट्टणकोडोली येथे त्याची मोटारसायकल मिळाली होती. त्याचे मोबाईलचे लोकेशन सौदलगा कर्नाटक सीमाभाग येथे होते. अपहरणानंतर सलग दोन दिवस दीपकने नातेवाईकांबरोबर बोलून १५ लाखाची व्यवस्था करावी आणि माझी सुटका करावी असे सांगितले होते.

त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद होता. आठ दिवसापूर्वी त्यांचा मोबाईल बेळगाव -सोलापूर एसटी बसमध्ये सीटच्या खाली मिळाला होता. संकेश्वर जवळ एका जोडप्यास हा मोबाईल मिळाला तो चालू केल्यावर यावर दीपकच्या हैदराबादच्या बहिणीचा फोन आला. तिने दीपकविषयी विचारणा करताच संबंधित जोडप्याने हा फोन बसमध्ये सापडल्याचे सांगितले. हा फोन हातकणंगले पोलिसांना मिळताच मोबाईल वरील कॉल डिटेक्शनवरून तपासाची यंत्रणा गतिमान झाली आणि. स्थानिक गुन्हे शाखा पथकाने या खुनाचा उलगडा केला. दीपक पटेलच्या मृतदेहाची रात्री उशिरा पर्यन्त सीपीआर रुग्णालयात उतरीय तपासणी सुरु होती.

मोबाईलमुळे खुन्यापर्यंत पोहोचण्यास मदत

दीपकचा मोबाईल त्यांच्या खुन्यापर्यन्त घेऊन जाण्यात यशस्वी झाला. मोबाईल सापडला त्यामुळे पोलिसानी त्यावरील रेकॉर्ड, कॉल, आणि लोकेशन तपासून अपहरणकर्त्याच्या मुसक्या आवळल्या.

तर दीपकचा जीव वाचला असता

स्थानिक पोलीस आणि जिल्हा गुन्हे शाखा यांच्यामध्ये समन्वय नसल्याने दीपकचा शोध घेण्यात पोलीस यंत्रणेला अडचणीचे ठरत होते. स्थानिक पोलीस अपहरणाच्या दिवशी तात्कळ ॲक्शन मोडवर दिसले असते तर दीपकचा जीव वाचला असता.

Web Title: Murder of missing timber trader Deepak Patel in Hatkanangle, four arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.