भाच्याला वाचवण्यास गेलेल्या मामाचा खून, चौघाना अटक; जमिनीच्या मोबदल्याच्या वाटणीवरून वाद
By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2022 01:19 PM2022-03-14T13:19:15+5:302022-03-14T14:05:31+5:30
शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा खून झाला आहे.
देवाळे : पन्हाळा तालुक्यातील आवळी पैकी पोवारवाडी येथे शासनाकडून भूसंपादन केलेल्या जमिनीच्या मिळालेल्या मोबदल्यातील वाटणीवरुन वादातून झालेल्या मारहाणीत भाच्याला वाचविण्यास गेलेल्या मामाचा रविवारी रात्री उशिरा खून झाला. रघुनाथ ज्ञानू पोवार (वय ७०, आवळी पैकी पोवारवाडी) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
या प्रकरणी कोडोली पोलिसात गुन्ह्याची फिर्याद जखमी भगवान महादेव पाटील (रा. आवळी पैकी पोवारवाडी) यांनी दिली. पोलिसानी संशयित आरोपी प्रविण सुभाष पाटील, प्रदीप विश्वास पाटील, विश्वास बाबुराव पाटील (तिघे, रा. आवळी पैकी पोवारवाडी) आणि दिलीप शामराव गराडे (रा. पैजारवाडी) ता. पन्हाळा यांना पोलीसांनी अटक केली. खून झालेल्या मामाचे संशयित आरोपी हे देखील भाचेच आहेत.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, भगवान पाटील आणि संशयित आरोपी प्रविण, प्रदीप आणि विश्वास पाटील हे एकाच गावातील असून एकमेकाच्या घरासमोर राहतात. यांच्यामध्ये गट नंबर ७४१ (अ) मधील कोल्हापूर –रत्नागिरी रोडसाठी भुसंपादित जमिनीला शासनाकडून मिळालेल्या पैशाच्या वाटणीवरुन गेले पंधरा दिवसापासून वाद सुरु होता.
काल, रविवारी भगवान पाटील हे रात्री साडेनऊच्या सुमारास घराचे दारात हातपाय धुत असताना संशयित आरोपी प्रविण पाटील याने शिवीगाळ करुन भगवान पाटील यांना काठीने मारहाण केली. हा वाद ऐकून त्यांची पत्नी व मामा रघुनाथ ज्ञानु पोवार भांडण सोडविण्यासाठी गेले असता सर्व संशयित आरोपींनी रघुनाथ पोवार यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली. यामध्ये रघुनाथ यांचा जागीच मृत्यू झाला.
संशयितांनी घराचा दरवाजा तोडून घरात बसलेला मुलगा प्रतिक याला दगडाने मारहाण करुन दहशत माजवली. या घटनेनंतर जखमी भगवान पाटील यांनी कोडोली पाटील ठाण्यात फिर्याद दिली. सहायक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड यांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा करुन संशयित आरोपींना अटक केली. आज सोमवारी दुपारी त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.