kolhapur news: जगतापनगरमधील ऋषीकेशचा खून आर्थिक वादातून, चौघांना अटक; पोलिसांनी चोवीस तासांत लावला छडा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2023 11:45 AM2023-01-21T11:45:39+5:302023-01-21T11:48:01+5:30
यातील एका संशयिताच्या घरी पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला
कोल्हापूर : जगतापनगर पाचगाव येथे बुधवारी रात्री झालेल्या ऋषीकेश ऊर्फ संभा महादेव सूर्यवंशी (वय २५, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) यांच्या खुनाचा पोलिसांनी चोवीस तासांत छडा लावला असून या खूनप्रकरणी चौघा तरुणांना अटक केली आहे. पूर्ववैमनस्य व आर्थिक देवघेवीच्या वादातून बुधवारी (दि. १८) रात्री दगडाने ठेचून व चाकूचे वार करून ऋषीकेशचा खून करण्यात आल्याचे तपासात समोर आले आहे. करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत खुनाच्या तपासाची माहिती दिली.
ऋषभ विजय साळोखे (वय २१, रा. हरिमंदिराच्या मागे, रामानंदनगर), सोहम संजय शेळके (२०, स्वाती विहार अपार्टमेंट, गजानन महाराजनगर), गणेश लिंगाप्पा यलगटी (२०, रा, अमृतनगर, गिरगाव-पाचगाव रोड), अथर्व संजय हावळ (२०, रा. कुंभार गल्ली, शाहू उद्यानमागे, मंगळवार पेठ) चार संशयितांचा समावेश आहे. या चौघा संशयितांना आज, शनिवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी, बुधवारी रात्री जगताप काॅलनी परिसरातील निर्जन माळावर ऋषीकेश सूर्यवंशी याचा डोक्यात दगड घालून तसेच चाकूने वार करून निर्घृण खून करण्यात आला होता. या प्रकरणाचा करवीर पोलिसांनी २४ तासांत उलगडा करून चौघांना अटक केली.
ही कारवाई करवीर पोलिस व स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तरीत्या केली. यात करवीरचे पोलिस उपअधीक्षक संकेत गोसावी, पाेलिस निरीक्षक अजय सिंदकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक संजय गोर्ले यांनी मार्गदर्शन केले. यात सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, योगेश शिंदे, अमोल चव्हाण, दिलीप घाटगे, विजय पाटील, अशोक मंत्रे, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे अजय वाडेकर, सहायक फौजदार सुनील कवळेकर, ओंकार परब, प्रशांत कांबळे, विनायक चौगुले, संजय कुंभार यांनी यांनी चांगली कामगिरी बजावली.
तिघे एकाच गाडीवरून
बुधवारी (दि. १८) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास मृत ऋषिकेश, अथर्व व गणेश हे तिघे गंगावेश चौकात एकत्र भेटले. ऋषिकेशला संशयितांनी आपल्या मोपेडवर बसवून एका बारमध्ये नेले. त्या ठिकाणी तिघांनीही भरपूर मद्यप्राशन करून ते पाचगावच्या दिशेने गेले. पाचगावात पोहोचल्यानंतर घटनास्थळी त्यांनी पुन्हा मद्यप्राशन केले. दरम्यान गणेश व अथर्वची ऋषीकेशसोबत झटापट झाली. यातून गणेशने ऋषीकेशच्या डोक्यात दगड घातला; तर वृषभने त्याच्यावर चाकूने वार केले.
संशयिताच्या आईचा आत्महत्येचा प्रयत्न
यातील एका संशयिताच्या घरी पोलिस चौकशीला गेल्यानंतर त्याच्या आईला धक्का बसला. त्यांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांना नातेवाइकांनी तत्काळ सीपीआर रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. याची सीपीआर पोलिस चौकीत नोंद झाली आहे.