रिल्समधील खुन्नस; कोल्हापुरात सपासप दहा वार करून गुन्हेगाराचा निर्घृण खून, संशयितांची धरपकड सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 06:45 PM2024-06-14T18:45:38+5:302024-06-14T18:46:58+5:30

शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि जुना राजवाडा पोलिसांची दोन पथके रवाना झाली

Murder of Sujal Kamble, a criminal from Sambhajinagar area in Kolhapur due to past enmity and killing each other from the reels | रिल्समधील खुन्नस; कोल्हापुरात सपासप दहा वार करून गुन्हेगाराचा निर्घृण खून, संशयितांची धरपकड सुरू 

रिल्समधील खुन्नस; कोल्हापुरात सपासप दहा वार करून गुन्हेगाराचा निर्घृण खून, संशयितांची धरपकड सुरू 

कोल्हापूर : पूर्ववैमनस्य आणि रिल्समधून एकमेकांना खुन्नस दिल्याच्या कारणातून येथील संभाजीनगर परिसरातील सुधाकर जोशी नगरात पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार सुजल बाबासो कांबळे (वय २०, रा. वारे वसाहत, कोल्हापूर) याचा आठ ते दहा जणांनी पाठलाग करून तलवार आणि एडक्याने सपासप वार करत निर्घृण खून केला.

ही थरारक घटना गुरुवारी (दि.१३) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली. याबाबत मृत सुजलचा चुलता अजय किरण कांबळे (वय २५, रा. वारे वसाहत) याने जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. संशयितांची धरपकड सुरू असून, रात्री उशिरा चार ते पाच जणांना चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले.

गेल्या दोन वर्षांपासून राजेंद्रनगर येथील कुमार गायकवाड आणि अमर माने या दोघांच्या टोळीतील वाद धुमसत आहे. याची व्याप्ती वारे वसाहतीपर्यंत पोहोचली आहे. कुमार गायकवाड याच्या खुनानंतर त्याच्या टोळीतील काही सदस्य अमर माने याच्या टोळीतील सदस्यांच्या मागावर आहेत. यातून दोन्ही टोळ्या सोशल मीडियातील रिल्सद्वारे एकमेकांना खुन्नस देत आहेत. वारे वसाहतीमधील सुजल कांबळे याने त्याच्या मित्रांसोबत काही रिल्स करून विरोधी टोळीला आव्हान दिले होते. गुरुवारी दुपारी सुजल हा तेजस कदम, रोहित जाधव, अभिषेक जाधव, जोतिबा बोंगाणे आणि संतोष कुदळे यांच्यासोबत दुचाकीवरून संभाजीनगरकडे निघाला होता. टिंबर मार्केटमधून सुधाकर जोशी नगरकडे जाताना पाऊस आल्याने ते म्हसोबा मंदिराजवळ थांबले.

काही वेळातच टिंबर मार्केटकडून तीन दुचाकींवरून आलेल्या आठ ते दहा तरुणांनी सुजलसह त्याच्या मित्रांवर हल्ला चढवला. हातातील तलवारी आणि एडके पाहून सर्वांनी धूम ठोकली. रस्त्याने पळत जाणाऱ्या सुजलचा पाठलाग करून हल्लेखोरांनी त्याला लक्ष्य केले. ओरडत पळणाऱ्या सुजल याला तीन ठिकाणी पाडून हल्लेखोरांनी त्याच्या हातावर, पाठीत आणि पोटावर आठ ते दहा वार केले. तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर हल्लेखोरांनी पळ काढला. हल्ल्याच्या भीतीने पळालेल्या मित्रांनी काही वेळाने माघारी येऊन गंभीर जखमी अवस्थेतील सुजल याला दुचाकीवरून सीपीआरमध्ये दाखल केले. सुजल याच्या मित्रांनी आणि नातेवाईकांनी सीपीआरमध्ये गर्दी केली. भरदिवसा रस्त्यात घडलेल्या थरारक घटनेने परिसरात खळबळ उडाली. स्थानिक रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.

कुटुंबाला धक्का

मारामारी, दमदाटीचे तीन गुन्हे दाखल असलेल्या सुजलमध्ये सुधारणा होईल, असा त्याच्या आईवडिलांना विश्वास होता. मात्र, टोळक्यात अडकलेल्या सुजलचा अवघ्या २० व्या वर्षी खून झाल्याने त्याच्या कुटुंबीयांना धक्का बसला. त्याचे वडील खासगी नोकरी करतात. आई गृहिणी आहे. तब्येतीने दणकट असल्यामुळे पैलवान या नावाने त्याची मित्रांमध्ये ओळख होती.

पोलिस घटनास्थळी

घटनेची माहिती मिळताच जुना राजवाडा पोलिस ठाण्यासह स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये पोहोचले. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके यांनी घटनास्थळी आणि सीपीआरमध्ये भेट देऊन अधिका-यांना तपासाबद्दल सूचना दिल्या. ठसेतज्ज्ञ, फॉरेन्सिक लॅबची पथके घटनास्थळी पोहोचली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक संजीव झाडे यांच्यासह पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात होता.

चार पथके रवाना

हल्लेखोर गायकवाड टोळीशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यांच्या शोधासाठी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची दोन आणि जुना राजवाडा पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. रात्री उशिरापर्यंत चार ते पाच संशयित पोलिसांच्या हाती लागले.

Web Title: Murder of Sujal Kamble, a criminal from Sambhajinagar area in Kolhapur due to past enmity and killing each other from the reels

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.