Kolhapur: अंबप येथे तरुणाचा निर्घृण खून, संशयिताच्या शोधासाठी पथके रवाना
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2024 12:15 PM2024-12-03T12:15:08+5:302024-12-03T12:15:17+5:30
शालेय वादाची जुनी पार्श्वभूमी
पेठवडगाव : अंबप (ता. हातकणंगले) येथे १९ वर्षीय तरुणाचा अज्ञात तीन तरुणांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला. सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. पूर्ववैमनस्यातून खून झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. यश किरण दाभाडे (वय १९, रा. अंबप) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
घटनास्थळ व पोलिसातून मिळालेल्या माहितीनुसार, अंबप ते अंबप फाटा रस्त्यावर बौद्ध समाजाची स्मशानभूमी आहे. येथे शेजारीच पाण्याची टाकी आहे. येथे नेहमी ग्रामस्थ बसतात. दरम्यान, यश दाभाडे सायंकाळी अंबप येथील पाण्याच्या टाकीजवळ बसलेला होता. दरम्यान, सातच्या सुमारास मोटारसायकलवरून तीन तरुण अचानक आले. त्यांनी बेसावध असलेल्या यशवर कोयत्याने सपासप वार करून महामार्गाच्या दिशेने ते पळून गेले. या हल्ल्यात यशच्या डोक्यात वर्मी घाव बसला, तसेच अतिरक्त रक्त व झाल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्यात आठ वार केले होते तर डावा हात मनगटातून तुटला होता.
दरम्यान, या पाण्याच्या टाकीतील पाणी महिला भरत असताना रक्ताच्या थारोळ्यातील मृतदेह निदर्शनास आला. या महिलेने ओरडत या घटनेची माहिती दिली. घटना उघडकीस आल्यानंतर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. दरम्यान, पेठवडगावचे पोलिस निरीक्षक विलास भोसले, सहायक पोलिस निरीक्षक कैलास कोडक, संजय माने, उपनिरीक्षक संतोष माने यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
कोल्हापूरहून स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग, फॉरेन्सिक तज्ज्ञांचे पथक दाखल झाले, तसेच श्वानपथक, शोधपथकही दाखल झाले. घटनास्थळी पंचनामा करून नवे पारगाव येथे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. संशयितांच्या शोधासाठी पथके तैनात केली आहेत. यश दाभाडे याच्या पश्चात आई-वडील व दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. तो एकुलता होता. वडील इचलकरंजी येथे बेकरी चालवितात तर आई एका शाळेत नोकरीला होत्या.
शालेय वादाची जुनी पार्श्वभूमी
यश दाभाडे याच्याविरोधात १० सप्टेंबर २०२३ ला तरुणावर चाकूने वार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याअंतर्गत त्याला ताब्यात घेण्यात आले होते. तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला सुधारगृहात ठेवण्यात आले होते. काही महिन्यांपूर्वी तो गावात आला होता. या प्रकरणातून खून झाला असावा का, याचा तपास पोलिस करत आहेत.