पुंगळ्या, गोळी सीबीआयच्या ताब्यात
By Admin | Published: February 19, 2016 01:14 AM2016-02-19T01:14:29+5:302016-02-19T01:16:56+5:30
पानसरे हत्या प्रकरण : नवी दिल्लीतील प्रयोगशाळेत होणार तपासणी
कोल्हापूर : ज्येष्ठ नेते अॅड. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पाच पुंगळ्या व डॉक्टरांनी पानसरे यांच्या अवयवांमधून काढण्यात आलेली एक गोळी गुरुवारी नवी मुंबई येथील केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाच्या पथकाला देण्यात आली. बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांनी सीबीआयचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके यांना कोल्हापूर जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात दुपारी दिल्या. त्यानंतर सीबीआयच्या या अधिकाऱ्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्याशी चर्चा करून हे पथक येथून बाहेर पडले.
दरम्यान, पानसरे हत्येतील मिळालेल्या या पुंगळ्या व गोळी सीबीआयचे हे पथक लवकरच नवी दिल्लीतील सेंट्रल फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीज (सीएफएसएल) येथे तपासासाठी देणार आहे.
गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी राजारामपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अमृत देशमुख यांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सीबीआयच्या अधिकाऱ्यांना पानसरे हल्ल्यातील जप्त पुंगळ्या व गोळी द्याव्यात, अशी सूचना सकाळी केली. त्याप्रमाणे अमृत देशमुख हे दुपारी बंद लखोट्यामधून पुंगळ्या व गोळी घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात आले. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय वर्मा यांच्याशी सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी वर्मा यांच्या दालनात चर्चा करून ते विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालयातून दुपारी तेथून बाहेर पडले. सीबीआयचे सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश देवरे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोडके हे दोन अधिकारी ते दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास जिल्हा पोलीस कार्यालयात आले. त्यावेळी देवरे यांनी पानसरे हल्ल्यातील पुंगळ्या व गोळी मिळाव्यात, असे सीबीआयचे मागणीपत्र पोलीस निरीक्षक अमृत देशमुख यांना दिले. त्यानंतर देशमुख यांनी दोन पंचांसमक्ष सीबीआयला बंद लखोट्यामधून पाच पुंगळ्या व एक गोळी दिली.
कोल्हापुरात सागरमाळ येथे दि. १६ फेबु्रवारी २०१५ ला गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नी उमा यांच्यावर रिव्हॉल्व्हरमधून गोळ्या झाडण्यात आल्या. दि. २० फेबु्रवारीला गोविंद पानसरे यांचा मुंबईत एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. सध्या या प्रकरणाचा तपास एसआयटीचे (विशेष तपास पथक) प्रमुख संजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे. दाभोलकर व पानसरे यांच्या तपास यंत्रणेला या दोन्ही हत्यांमध्ये साधर्म्य असून एकाच प्रकारच्या रिव्हॉल्वरमधून हा दोन्ही हत्येचा झाल्याचा तर्क तपास यंत्रणेने यापूर्वी काढला आहे.
दरम्यान,‘अंनिस’चे संस्थापक नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने पानसरे हत्येमधील पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरून जप्त केलेल्या पुंगळ्या व गोळी तपासासाठी मिळाव्यात, अशी विनंती अर्जाद्वारे कोल्हापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल. डी. बिले यांच्या न्यायालयाकडे केली होती. त्यानुसार न्यायालयाने तपास अधिकारी व सरकारी वकिलाचे मत घेऊन सीबीआयच्या अर्जाला मंजुरी दिली. न्यायालयाने पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांना राजारामपुरी पोलिसांनी जप्त केलेल्या पुंगळ्या व एक गोळी द्याव्यात, असे आदेशाचे पत्र पाठविले होते.