रंकाळा टॉवर येथे तरुणावर खुनी हल्ला
By admin | Published: April 19, 2015 01:17 AM2015-04-19T01:17:34+5:302015-04-19T01:17:34+5:30
उसने घेतलेले पैसे मागितल्याच्या रागातून हल्ला
कोल्हापूर : उसने घेतलेले तीस हजार रुपये मागितल्याच्या रागातून तरुणाच्या डोक्यात लोखंडी गजाने खुनी हल्ला करण्यात आला. त्यामध्ये महेंद्र बापू भोरे (वय ३०, रा. शहाजी वसाहत) हा गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्राने त्याला तातडीने सीपीआरमध्ये दाखल केले. ही घटना शनिवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.
दरम्यान, जखमी भोरे याने संशयित सचिन अशोक पाटील (रा. रंकाळा टॉवर) याच्यासह चौघांनी आपल्याला जातिवाचक शिवीगाळ करून हल्ला केल्याची फिर्याद लक्ष्मीपुरी पोलिसांत दिली. गुन्हा दाखल झाल्याचे समजताच संशयित पसार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
याबाबत महेंद्र भोरे याने सांगितले, मी टॅम्पोचालकाचे काम करतो. व्यवसायातून सचिन पाटील याच्याशी ओळख झाली. त्यातून आम्ही दोघे मित्र झालो. सचिन याने माझ्याकडून दीड महिन्यापूर्वी तीस हजार रुपये उसने घेतले होते. ते पैसे मागत असल्याने त्याने मोबाईल बंद ठेवला होता. त्यामुळे मी व मित्र रवींद्र केसरकर यालाघेऊन रंकाळा टॉवर येथे गेलो. या ठिकाणी सचिन हा अन्य मित्रांसोबत थांबला होता. त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता त्याने जातिवाचक शिवीगाळ केली. दोघांची वादावादी पाहून त्याचे मित्र त्या ठिकाणी आले. त्यांनी मारहाण करीत माझ्या डोक्यात लोखंडी गजाने वार करून ते निघून गेले. तेथून मित्राने मोटारसायकलवरून एका खासगी रुग्णालयात नेले. या ठिकाणी डॉक्टरांनी सीपीआरला जाण्यास सांगितले. सीपीआरमध्ये जखम पाहून डॉक्टरांनी तातडीने शस्त्रक्रिया केली. या हल्ल्याची माहिती समजताच माजी नगरसेवक दत्ता टिपुगडे यांच्यासह नातेवाईक व मित्रांनी सीपीआरमध्ये गर्दी केली होती. याप्रकरणी संशयितासह चौघांच्या विरोधात लक्ष्मीपुरी पोलिसांत फिर्याद दिली आहे. (प्रतिनिधी)