उत्तरेश्वर पेठेतील तरुणावर खुनी हल्ला
By admin | Published: July 14, 2016 12:38 AM2016-07-14T00:38:01+5:302016-07-14T00:38:01+5:30
देवकर पाणंद चौकातील घटना : चौघा तरुणांवर गुन्हा
कोल्हापूर : येथील देवकर पाणंद चौकात अज्ञात चौघा तरुणांनी तरुणावर खुनी हल्ला केला. विक्रम सुरेश घाटगे (वय २८, रा. जिव्हाळा कॉलनी, उत्तरेश्वर पेठ) असे त्याचे नाव आहे. हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने त्याच्या डोक्यात, मानेवर, तोंडावर, छातीवर, पोटावर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर सीपीआरच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हल्ला कोणी केला व कोणत्या कारणांतून झाला हे रात्री उशिरापर्यंत स्पष्ट झाले नव्हते.
याबाबत पोलिसांनी सांगितले, देवकर पाणंद चौकात वाहनांसह नागरिकांची गर्दी असते. याठिकाणी रिक्षास्टॉपही आहे. बुधवारी दुपारी चारच्या सुमारास विक्रम घाटगे हा मोटारसायकलवरून देवकर पाणंदकडून उत्तरेश्वर पेठकडे जात असताना देवकर पाणंद चौकात चौघा तरुणांनी त्याला अडविले. शिवीगाळ करत त्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करू लागले. त्यानंतर एकाने धारदार शस्त्राने त्याच्यावर वार केले. रक्ताच्या थारोळ्यात तो रस्त्यावर पडून राहिला. भरचौकात झालेला हल्ला पाहून नागरिक भयभीत झाले. हल्लेखोर तरुणांनी तेथून पळ काढला. या घटनेची माहिती जुना राजवाडा पोलिसांना मिळताच पोलिसांनी सीपीआरमध्ये धाव घेतली. जखमी विशाल हा बेशुद्ध असल्याने नेमका हल्ला कोणी केला. कोणत्या कारणासाठी केला, याची माहिती पोलिसांना मिळू शकली नाही. त्याचे वडील सुरेश शिवाजीराव घाटगे हे सीपीआरमध्ये आले. त्यांच्यापाठोपाठ त्याचे नातेवाईक व मित्रपरिवाराने सीपीआरमध्ये गर्दी केली होती. पोलिसांनी वडिलांचा जबाब घेतला असता त्यांनी माझी मानसिक स्थिती बरोबर नाही. मुलाचे कोणासोबत पूर्ववैमनस्य होते ते मला माहीत नसल्याचे सांगितले. पोलिसांनी त्यांची फिर्याद घेऊन अनोळखी चौघा तरुणांच्या विरोधात खुनाचा प्रयत्न (३०७) गुन्हा दाखल केला. हल्ल्याची माहिती मिळू शकत नसल्याने पोलिसांनी देवकर पाणंद चौकात येऊन तेथील रिक्षाचालक, दुकानदार, हॉटेलमालकांकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला. आजूबाजूला कुठे सीसीटीव्ही आहेत का, याचीही चाचपणी पोलिसांनी केली. विशाल शुद्धीवर आल्यानंतर हल्लेखोर कोण होते. त्यांनी हल्ला का केला, हे उघड होणार आहे.
मोबाईलवरील कॉलची माहिती
विशाल हा शेती करतो. तो उत्तरेश्वर पेठेत राहत असताना देवकर पाणंद चौकात आला कसा, त्याला कोणी बोलावून घेतले होते का? त्याच्यावर मोबाईलवर आलेल्या कॉल्स्ची पोलिस माहिती घेत आहेत. त्याच्यावर झालेल्या हल्ल्याने उत्तरेश्वर पेठेत तणाव पसरला आहे.
नागरिकांकडून बघ्याची भूमिका
गंभीर जखमी अवस्थेत विशाल रस्त्यावरच पडून होता. त्याला मदत करण्याचे धाडस येथील एकाही नागरिकाने केले नाही. त्यांच्यासमोरच हल्लेखोर त्याला मारहाण करत होते; परंतु कोणीही पुढे होऊन त्याची सुटका केली नाही. काही वेळाने त्याने स्वत:च मोबाईलवरून मित्रांना ही माहिती दिली. मित्र घटनास्थळी येईपर्यंत तो बेशुद्ध पडला होता. मित्रांनी त्याला रिक्षातून सीपीआरमध्ये दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने अतिदक्षता विभागात त्याला हलविले. (प्रतिनिधी)