Kolhapur News: आईला त्रास दिल्यानेच शिक्षकावर खुनी हल्ला, पोलिस तपासात उघड
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 12:24 PM2022-12-28T12:24:13+5:302022-12-28T12:24:40+5:30
हल्ला करणाऱ्या दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले
कोल्हापूर : अनेकवेळा आईला फोन करून त्रास दिल्याच्या रागातून कदमवाडी शाळेतील शिक्षक संजय आनंदा सुतार (४५, रा. वरणगे पाडळी, ता. करवीर) यांच्यावर खुनी हल्ला झाल्याचे मंगळवारी पोलिस तपासात समोर आले. याप्रकरणी हल्ला करणारे विचारेमाळ पन्हाळकर गल्लीतील दोन अल्पवयीन मुलांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. त्यांच्याकडून हल्ल्यासाठी वापरलेला कोयता व इतर साहित्य जप्त करण्यात आले.
पोलिसांनी सांगितले की, शिक्षक संजय सुतार यांच्यावर सोमवारी दुपारी दोघांनी कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. ते गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, हा हल्ला नववीच्या वर्गातील विद्यार्थ्याला वर्गात दंगा करतोस म्हणून अंगठा धरण्याची शिक्षा दिल्याच्या रागातून झाल्याचे प्राथमिक माहितीनुसार समोर आले होते.
मात्र, ज्या द्वेषातून संजयवर हल्ला करण्यात आला, जिवे मारण्यासाठी म्हणून कोयत्याने सपासपा वार केले, यावरून कारण आणखी काळी वेगळे असल्याचा संशय पोलिसांना आला. पोलिसांनी त्या दिशेने तपासाची चक्रे फिरवली.
तपासात शिक्षकाने त्या नववीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या आईच्या मोबाइलवर अनेकवेळा संपर्क साधून त्रास दिल्याचे स्पष्ट झाले. याचा प्रचंड राग आल्याने शिक्षा दिलेल्या विद्यार्थ्याचा भाऊ आणि मित्राने शिक्षक संजय यांच्यावर हल्ला केले. हल्ल्याचे कारण वेगळेच समोर आल्याने या प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. यामध्ये आणखी कोण आहे का? याचा तपास पोलिस करीत आहेत.