कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 11:50 AM2018-11-14T11:50:43+5:302018-11-14T11:51:34+5:30

यशकथा : मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो.

'Murghas' project for animals implemented successfully in Kolhapur | कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

कोल्हापुरात शेतकऱ्याने राबवला जनावरांसाठी बारमाही सकस ‘मुरघास’ प्रकल्प

googlenewsNext

- घनश्याम कुंभार (यड्राव, कोल्हापूर) 

जांभळी  (ता. शिरोळ) येथील मोटके-पाटील डेअरी फार्मने जनावरांसाठी पौष्टिक ‘मुरघास’प्रकल्प उभा केला आहे. जनावरांसाठी बारमाही पौष्टिक चारा यामुळे मिळणार आहे. मोटके-पाटील यांनी राज्यातील पहिला प्रकल्प यशस्वी केला असून, दुष्काळी जिल्ह्यात हा प्रकल्प खूप उपयुक्त ठरू शकतो. त्यांनी आतापर्यंत दूध व्यवसायात विविध यशस्वी प्रयोग केले आहेत. काहीतरी नवीन करून हा व्यवसाय विकसित करण्याकडे हे कुटुंब सतत धडपडत असते.

‘मुरघास’ किंवा ‘सायलेज प्रकल्प’ उभा करण्याचा संकल्प केल्यानंतर जमिनीपासून दोन फूट खोल, २0 फूट रूंद व ६0 फूट लांबीचा खड्डा काढला. खड्ड्यातील माती सभोवती रचून घेतली. खड्ड्यात ५०० मायक्रॉन जाडीचा ८० बाय ४० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून घेतला. कडबाकुट्टीच्या साहाय्याने कापलेला हिरवा मका त्या खड्ड्यात पसरून घेतला. मक्याच्या कुट्टीचे चार ते पाच थर केले, शेवटच्या थरानंतर २५ बाय ८० फूट आकाराचा प्लास्टिक कागद पसरून कुट्टी हवाबंद केली जाते. हवाबंद मका कुट्टी २१ दिवसांनंतर जनावरांना खाद्य म्हणून दिले जाते. ओल्या मक्यासारखाच सकस व पौष्टिकता टिकून राहते. या खाद्याला गोडवा असल्याने जनावरेही आवडीने खातात. दुभत्या जनावरांना हे खाद्य फारच उपयुक्त ठरत आहे. एका सायलेजमध्ये १५० टन खाद्य तयार होते, त्यासाठी साडेचार लाख रुपये खर्च येतो. 

अलीकडे दूध व्यवसाय महाराष्ट्रात झपाट्याने वाढत आहे; पण दुष्काळ, पाणीटंचाईने मराठवाड्यासह पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत हा व्यवसाय जोखमीचा बनला आहे. दुभत्या जनावरांना बारमाही सकस चाऱ्याची गरज असते; पण जनावरांना पिण्यासाठी पाणीच नसते, मग हिरवा सकस चारा आणायचा कोठून? हा प्रश्न शेतक-यांसमोर असतो, त्यासाठी पावसाळ्यात व पाणी उपलब्ध आहे त्या कालावधीत मक्यासह इतर वैरणीचे पीक घ्यायचे आणि या पद्धतीने ‘मुरघास’ तयार करून ठेवले, तर बारमाही सकस व पौष्टिक खाद्य जनावरांना उपलब्ध होऊ शकते. हा आहार जनावरांचे दूध वाढवतेच, पण अंगातील ताकदही कायम राखते. 

अण्णासाहेब बाळगोंडा मोटके-पाटील व त्यांची मुले अभय व अक्षय यांनी हा प्रकल्प यशस्वी केला आहे. मोटके-पाटील यांनी यापूर्वी बायोगॅस प्रकल्प, वीजनिर्मिती प्रकल्प, डेअरी फार्मिंग व विदेशी विर्याद्वारे गार्इंच्या गर्भधारणा करून होणारे वासरू संगोपन प्रकल्प यशस्वी केले आहेत. आता ‘मुरघास’चा राज्यातील पहिला मोठा प्रकल्प त्यांनी यशस्वी केला आहे. त्यांच्या आतापर्यंतच्या कामाची दखल घेऊन २०१८ चा इंडियन डेअरी असोसिएशनकडून ‘बेस्ट वूमन डेअरी फार्मर इन इंडिया’ या पुरस्काराने त्यांच्या कुटुंबाला गौरविण्यात आले. 

Web Title: 'Murghas' project for animals implemented successfully in Kolhapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.