मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय होणार उपजिल्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:23 AM2021-03-05T04:23:29+5:302021-03-05T04:23:29+5:30

मंत्री मुश्रीफ, खासदार मंडलिक यांचे प्रयत्न मुरगूड : मुरगूड परिसरासह राधानगरी व भुदरगड तालुक्यातील शेकडो गावांना नवं संजीवनी देणाऱ्या ...

Murgud's rural hospital will be a sub-district | मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय होणार उपजिल्हा

मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय होणार उपजिल्हा

googlenewsNext

मंत्री मुश्रीफ, खासदार मंडलिक यांचे प्रयत्न

मुरगूड : मुरगूड परिसरासह राधानगरी व भुदरगड तालुक्यातील शेकडो गावांना नवं संजीवनी देणाऱ्या मुरगूड ग्रामीण रुग्णालयाचे विस्तारीकरण होण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.मुंबई येथे आरोग्य मंत्र्यांच्या दालनात झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला आहे.येत्या दोन महिन्यांत या रुग्णालयाचा दर्जा उपजिल्हा रुग्णालय असा होणार असून, ३० बेडवरून ही मर्यादा ५० बेडपर्यंत वाढवणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यांनी दिली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार संजय मंडलिक यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले आहेत.

कागल राधानगरी व भुदरगड या तिन्ही तालुक्यांतील सुमारे १०० गावांना नवसंजीवनी देणाऱ्या या रुग्णालयामध्ये सध्या दररोज सुमारे २५०च्या आसपास रुग्णांची नोंद होते. अत्यल्प फी व सर्व उपचार मोफत होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना हे रुग्णालय सोयीचे ठरते आहे. दररोजच्या रुग्ण संख्येपेक्षा मंगळवारी सुमारे शंभरहून अधिक रुग्ण येतात. महिन्यातून सरासरी ३० ते ४० महिलांची प्रसूती या ठिकाणी होते. याशिवाय परिसरातील आरोग्य केंद्राअंतर्गत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया याच रुग्णालयात मोठ्या प्रमाणात केल्या जातात. एक्स-रेची सुविधा माफक फीमध्ये असल्याने दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे या रुग्णालयाचा विस्तार आवश्यक होता.

मंत्री पाटील यांच्या कार्यलयात मुरगूडचे नगराध्यक्ष राजेखान जमादार, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव, सार्वजनिक आरोग्य विभागाचे उप सचिव, आरोग्यसेवा रुग्णालय विभागाचे सह संचालक आदी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली. यावेळी मंत्री पाटील यांनी तत्काळ ग्रामीण रुग्णालय मुरगूड व जिल्हा रुग्णालय कोल्हापूर यांना याबाबतचा घोषवारा पाठवण्याचे आदेश दिले आहेत.दोन महिन्यांच्या आत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची परवानगी मिळून याबाबतचे आदेश निघतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.

सध्या या ग्रामीण रुग्णालयाच्या इमारती मध्येच विस्तारित रुग्णालय सुरू होणार आहे. यासाठी नवीन व जुनी इमारत वापरात येणार आहे. नवीन इमारतीमधील सर्व कार्यालये हलवून जुन्या इमारतीमध्ये नेली जाणार आहेत. या इमारतीच्या आजूबाजूला अजून रिकामी जागा आहे त्याठिकाणी ही विस्तारित इमारत बांधली जाणार आहे. तसेच रुग्णालयाच्या अवती भोवती वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना राहण्यासाठी कॉटेज तयार आहेत. मंडलिक यांच्या प्रयत्नातून आयसीयू विभाग सुरू आहे. पालिका कार्यक्रमाच्या दरम्यान जाहीरसभेत आरोग्यमंत्री पाटील यांच्याकडे ही मागणी नगराध्यक्ष राजेखान जमादार आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केली होती. त्यावेळी जाहीरपणे पाटील यांनी मुरगूडच्या रुग्णालयाला उप जिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार त्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत.

कागल राधानगरी भुदरगड तालुक्यातील सर्वसामान्य रुग्णांना संदर्भ सेवा घेण्यासाठी कोल्हापूर किंवा निपाणीकडे धाव घ्यावी लागते, जर तत्काळ मुरगूडमध्ये ५० खाटांचे उप जिल्हा रुग्णालय उभा झाले, तर ग्रामीण भागातील लोकांचा आरोग्याचा प्रश्न निकालात निघणार आहे.

फोटो ओळ : मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय उप जिल्हा रुग्णालय व्हावे या विषयावर आरोग्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या दालनात नुकतीच बैठक पार पडली यामध्ये नगराध्यक्ष राजेखान जमादार यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

मुरगूडचे ग्रामीण रुग्णालय

Web Title: Murgud's rural hospital will be a sub-district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.