मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांना तडीपार करणार
By admin | Published: March 27, 2016 01:15 AM2016-03-27T01:15:21+5:302016-03-27T01:15:21+5:30
दिनेश बारी : मोबाईल कॉल डिटेल्सची तपासणी सुरू
कोल्हापूर : क्रिकेट बेटिंगचा मुुख्य सूत्रधार महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांवर तडीपारची कारवाई करण्यासाठी जास्तीत जास्त पुरावे गोळा करून अहवाल सादर करण्याचे आदेश राजारामपुरी पोलिस निरीक्षकांना दिले आहेत. लवकरच त्यांच्यावर तडीपारची कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. दिनेश बारी यांनी शनिवारी पत्रकारांशी बोलताना दिली.
राजारामपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत सम्राटनगर येथील सावित्री अपार्टमेंटमधील फ्लॅटमध्ये स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी छापा टाकून टी-२० विश्वचषक स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्ध आॅस्ट्रेलिया क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेणाऱ्या दोघा पंटरांना अटक केली होती. महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पाच ते सहाजणांचे आम्ही पंटर असून त्यांच्या सांगण्यावरून बेटिंग घेत असल्याची कबुली त्यांनी दिल्याने पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली. अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांनी शनिवारी दुपारी राजारामपुरी पोलिस ठाण्यास भेट दिली. पोलिस निरीक्षक अमृत देशमुख यांच्याशी दीड तास चर्चा करून बेटिंगचा मुुख्य सूत्रधार महापालिकेचे स्थायी समितीचे सभापती मुरलीधर जाधव यांच्यासह पंटरांना तडीपार करण्यासाठी त्यांच्याविरोधात जास्तीत जास्त पुरावे गोळा करून तत्काळ अहवाल सादर करावा, अशा सूचना केल्या.
गतवर्षी सभापती मुरलीधर जाधव यांच्या टाकाळा येथील जयंत रेसिडेन्सी अपार्टमेंटमधील फ्लॅट नं. ४०२ मध्ये आॅस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंडच्या चालू क्रिकेट सामन्यावर बेटिंग घेत असताना राजारामपुरी पोलिसांनी छापा टाकला होता. यावेळी जाधव यांनी अटकपूर्व जामीन मिळविला होता; परंतु पोलिस निरीक्षक देशमुख यांनी बेटिंगचा म्होरक्या जाधव यांचा जामीन रद्द करण्यासाठी जिल्हा व सत्र न्यायालयात रिव्हिजन (अपील) दाखल करून त्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. कठोर कारवाई होऊनही सभापती जाधव यांच्यात सुधारणा झालेली नाही. त्यांचे अवैध धंदे सुरूच आहेत, त्यामुळे त्यांना तडीपार करण्याची तयारी पोलिसांनी केल्याचे अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. बारी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.