राष्ट्रवादीकडून ‘स्थायी’साठी मुरलीधर जाधव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2016 12:55 AM2016-02-02T00:55:01+5:302016-02-02T00:55:01+5:30
समिती सभापती निवडी : विरोधी आघाडीतर्फे सत्यजित कदम, रूपाराणी निकम यांचे अर्ज; ‘परिवहन’साठी लाला भोसले, विजयसिंह खाडेंचे अर्ज
कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदासाठी उमेदवार म्हणून अपेक्षेप्रमाणे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुरलीधर जाधव यांनी अर्ज भरला, तर विरोधी ताराराणी आघाडीतर्फे सत्यजित कदम, रूपाराणी संग्रामसिंह निकम यांनी अर्ज भरले, तर परिवहन सभापतिपदासाठी विजयसिंह पांडुरंग खाडे-पाटील (भाजप), लाला शिवाजी भोसले (काँग्रेस) यांनी अर्ज भरले. सध्याचे संख्याबळ पाहता काँग्रेस-राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याने त्यांचे उमेदवार विजयी होतील, परंतु शिवसेनेने भाजप-ताराराणी आघाडीला मदत करायची ठरविल्यास मात्र या निवडणुकीतील रंगत वाढणार आहे.
स्थायी समिती, परिवहन समिती व महिला बालकल्याण समिती सभापतिपदासाठी शुक्रवारी (दि. ५) सकाळी अकरा वाजता ताराराणी सभागृहात ही निवडणूक होणार आहे. त्यासाठी सोमवारी दुपारी ३ ते सायंकाळी ५ या वेळेत अर्ज दाखल करण्यात आले.
काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या गटाच्या नगरसेवकांची बैठक घेऊन सर्वांशी चर्चा केली. त्यातून त्यांनी परिवहन समिती व प्रभाग समिती सभापतींची नावे गटनेते शारंगधर देशमुख यांच्याकडे दुपारी दिली. ताराराणी आघाडी व भाजप नेते आमदार अमल महाडिक, स्वरूप महाडिक, सत्यजित कदम, विरोधी पक्षनेता संभाजी जाधव, गटनेता विजय सूर्यवंशी यांची बैठक होऊन त्यामध्ये पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या संमतीने त्यांच्या आघाडीच्या उमेदवारांची नावे जाहीर केली, तर राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या तीन इच्छुकांशी चर्चा करून दुपारी फोनवर गटनेते सुनील पाटील यांना नावे सांगितली. ताराराणी आघाडीकडून स्थायी समितीसाठी दोघांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. जर राष्ट्रवादीकडून सूरमंजिरी लाटकर यांचे नाव पुढे आले तर त्यांच्या विरोधात ‘ताराराणी’च्या रूपाराणी निकम लढतील असा निर्णय घेतला होता; परंतु मुरलीधर जाधव यांचे नाव पुढे आल्याने त्यांच्या विरोधात आता सत्यजित कदम लढतील, अशी अपेक्षा आहे.