विमानतळाच्या कामासाठी उजळाईवाडी, तामगाव परिसरात मुरूम उत्खनन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 04:33 AM2021-02-26T04:33:21+5:302021-02-26T04:33:21+5:30
कोल्हापूर : येथील विमानतळाची धावपट्टी, नवी टर्मिनल बिल्डींग, आदी कामांसाठी लागणाऱ्या मुरूमासाठी उजळाईवाडी, तामगाव परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू ...
कोल्हापूर : येथील विमानतळाची धावपट्टी, नवी टर्मिनल बिल्डींग, आदी कामांसाठी लागणाऱ्या मुरूमासाठी उजळाईवाडी, तामगाव परिसरात मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू आहे. विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाने संपादित केलेल्या जागेमध्येही उत्खनन करण्यात येत आहे. गडमुडशिंगी, पाचगाव, गोकुळ शिरगाव, आदी गावांमधूनही मुरूम आणला जात आहे.
या मुरूम उत्खननाच्या परवानगीबाबत ‘लोकमत’कडे काही नागरिकांनी तक्रार आणि शंका व्यक्त केली. त्यावर गुरूवारी ‘लोकमत’ प्रतिनिधी आणि छायाचित्रकार यांनी तामगाव, उजळाईवाडी परिसरात जावून ‘रिॲलिटी’ चेक केले. गेल्यावर्षी फेब्रुवारीमध्ये विमानतळ विस्तारीकरणातील धावपट्टीची लांबी वाढविणे आणि नव्या टर्मिनल बिल्डींगच्या कामाची सुरूवात झाली. विविध तीन ठेकेदारांच्या माध्यमातून ही कामे सुरू आहेत. धावपट्टी, टर्मिनल बिल्डींग या कामांसाठी साधारणत: एक लाख क्युबिक मीटर इतका मुरूम लागणार आहे. त्यासाठी विमानतळ परिसरापासून जवळ असलेल्या उजळाईवाडी तलाव परिसर, नेर्ली-तामगाव रोड, गोकुळ शिरगाव, पाचगाव, आदी गावांमधून मुरूम घेण्याला ठेकेदारांनी प्राधान्य दिले आहे. पोकलेन, जेसीबीसारख्या मोठ्या यंत्रांच्या माध्यमातून या गावांच्या परिसरात मुरूम उत्खनन करून मोठ्या डंपरच्या माध्यमातून विमानतळ परिसरातील या कामांच्या ठिकाणी आणण्यात येत आहे. विस्तारीकरणासाठी विमानतळ प्राधिकरणाने संपादित केलेल्या जागेत आणि त्यांच्या हद्दीमध्येदेखील मुरूम उत्खनन केले जात आहे. या उत्खननाबाबत ठेकेदाराचे प्रतिनिधी, उजळाईवाडीतील गावकामगार, तलाठी यांच्याकडे चौकशी केली असता, त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे रॉयल्टी भरून मुरूम घेण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रतिक्रिया
आम्ही टर्मिनल बिल्डींगचे काम करत आहोत. त्यासाठी आम्हाला २७ हजार क्युबिक मीटर मुरूमाची आवश्यकता आहे. त्याच्या रॉयल्टीची रक्कम आम्ही जिल्हा प्रशासनाकडे भरली आहे. आतापर्यंत आम्ही २५ हजार क्युबिक मीटर मुरूम घेतला आहे. मुरूमाचे काम संपले आहे.
- प्रसाद खनुकर, प्रकल्प व्यवस्थापक, हर्ष कन्स्ट्रक्शन.
प्रतिक्रिया
उजळाईवाडी तलाव परिसरात मुरूम उत्खननासाठी संबंधित ठेकेदाराने रितसर परवानगी घेतली आहे. त्याबाबतची सुमारे आठ लाखांची रॉयल्टी त्यांनी जिल्हा प्रशासनाकडे भरली आहे.
- बाळासो सरगर, तलाठी, उजळाईवाडी.
फोटो (२५०२२०२१-कोल-विमानतळ मुरूम उत्खन्न ०१, ०२, ०३) : कोल्हापुरातील विमानतळ विस्तारीकरणांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी उजळाईवाडी तलाव परिसरात मुरूम उत्खनन करण्यात आले आहे. (छाया : नसीर अत्तार)
फोटो (२५०२२०२१-कोल-विमानतळ मुरूम उत्खन्न ०४, ०५) : कोल्हापुरातील विमानतळ विस्तारीकरणांतर्गत सुरू असलेल्या कामांसाठी उजळाईवाडी परिसरात विमानतळाच्या हद्दीमध्ये मुरूम उत्खनन सुरू आहे. (छाया : नसीर अत्तार)