मस्कतचा डीडी’ उद्यापर्यंत
By admin | Published: November 1, 2015 12:48 AM2015-11-01T00:48:58+5:302015-11-01T00:56:57+5:30
जिल्हाधिकाऱ्यांकडून पाठपुरावा : पाठविल्याचे पत्र प्रशासनास प्राप्त
कोल्हापूर : पोरेवाडी (ता. चंदगड) येथील कै. नितीश पाटील यांच्या अपघाती मृत्यूनंतर मस्कत प्रशासनाने पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाख ३९ हजारांचा नवीन डिमांड ड्राफ्ट (डीडी) पोस्ट विभागाच्या प्रक्रियेत आहे. तो उद्या, सोमवारपर्यंत येईल अशी शक्यता जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी वर्तविली आहे. मस्कत प्रशासनाकडून ‘डीडी’ पाठविल्याचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला यापूर्वी प्राप्त झाले आहे. हे प्रकरण जिल्ह्यात खूप गाजले होते.
पोरेवाडी (ता. चंदगड) येथील नितीश तुकाराम पाटील यांचा मस्कत (ओमान) येथे अपघाती मृत्यू झाला होता. त्यांच्या वारसांना मस्कत प्रशासनाकडून पाठविलेला नुकसानभरपाईचा २३ लाखांच्या डिमांड ड्राफ्ट (डीडी) जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वसाधारण शाखेच्या गलथान कारभारामुळे गहाळ झाला होता.
प्रसारमाध्यमांनी हे प्रकरण उचलून धरल्यामुळे खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने मस्कत प्रशासन, तेथील भारतीय राजदूतावास यांच्याशी संपर्क साधायला सुरुवात केली. विशेषत: जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांनी यामध्ये विशेष लक्ष घालून पाठपुरावा सुरू केला.
अनेकवेळा जिल्हा प्रशासनाकडून झालेल्या पत्रव्यवहारानंतर शहानिशा झाल्यावर मस्कत प्रशासनाने नवीन ‘डीडी’ १९ आॅक्टोबरला पाठविला आहे, त्या संदर्भात पत्रही त्यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांना मिळाले आहे. हा ‘डीडी’ पोस्टाकडून जिल्हा प्रशासनाला मिळणार आहे. अद्याप तो पोस्टाकडेच आहे.
उद्या, सोमवारपर्यंत तो येण्याची शक्यता आहे. त्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाकडून पाठपुरावा सुरू आहे. यापूर्वी मिळालेला ‘डीडी’ मस्कत प्रशासनाकडून पाठविल्यानंतर तो पंधराव्या दिवशी जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाला होता. त्या आधारावरच तो सोमवारपर्यंत येतो की काय? असा कयास बांधला जात आहे. (प्रतिनिधी)
अतिरिक्त जिल्हाधिकारी बेफिकीर
‘डीडी’ केव्हा मिळणार या संदर्भात विचारणा करण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी अजित पवार यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. नेहमीप्रमाणे त्यांच्या मोबाईलच्या रिंग होतात; परंतु पलीकडून तो उचलला जात नसल्याचा प्रत्यय पुन्हा आला. यावरून ते या प्रकरणात किती संवेदनशील आहेत हे दिसून येते. प्रकरण चांगलेच तापल्याने कै. नितीश यांच्या नातेवाइकांची गोड बोलून बोळवण करणे एवढेच त्यांच्याकडून आतापर्यंत झाले आहे.