मुश्रीफ, कोरे, सतेज पाटील यांच्यात गुफ्तूगू, ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 03:32 PM2020-01-25T15:32:02+5:302020-01-25T15:36:51+5:30
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला.
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील व ‘जनसुराज्य’ पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्यात शासकीय विश्रामगृहात स्वतंत्रपणे सुमारे अर्धा तास बंद दाराआड चर्चा झाली. ‘गोकुळ’सह जिल्ह्याच्या राजकारणावर तिन्ही नेत्यांमध्ये विचारविमर्श झाला.
जिल्हा नियोजन मंडळाची बैठक शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या सभागृहात पार पडली. ही बैठक संपल्यानंतर पत्रकार परिषद झाली. ती सुरू असतानाच मंत्री हसन मुश्रीफ तेथून उठले आणि विश्रामगृहावर पोहोचले. त्यांच्या पाठोपाठ मंत्री सतेज पाटील हेही थोड्या वेळाने गेले. तत्पूर्वी मंत्री मुश्रीफ व आमदार विनय कोरे यांच्यात बंद दाराआड सुमारे वीस-पंचवीस मिनिटे चर्चा झाली. तेथून आमदार कोरे हे मंत्री पाटील यांच्या कक्षात गेले. तिथेही त्यांनी चर्चा केली.
‘गोकुळ’ व जिल्हा बॅँकेच्या निवडणुकीत आमदार कोरे हे आपल्यासोबत राहावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुरुवातीला कर्णसिंह गायकवाड यांना सत्तारूढ गटातून उमेदवारी द्यायच्या अटीवर विनय कोरे हे महादेवराव महाडिक, आमदार पी. एन. पाटील यांच्यासोबत जाणार होते. मात्र ठराव दाखल करण्याच्या वेळी आमदार कोरे यांनी वेगळी भूमिका घेतली.
कर्णसिंह गायकवाड हे विरोधी गटासोबत उपस्थित राहिल्याने त्यांची दिशा स्पष्ट झाली होती. शुक्रवारी तिन्ही नेत्यांच्या भेटीत याच विषयावर चर्चा झाली. जिल्हा बॅँकेवर ‘गोकुळ’च्या आघाडीचे काय परिणाम होतील; शेतकरी संघ, राजाराम साखर कारखान्यासह इतर बाबींवर भेटीत चर्चा झाल्याचे समजते.
आणखी दोन संचालक संपर्कात
‘गोकुळ’च्या तीन संचालकांनी सत्तारूढ गटापासून फारकत घेतली आहे. ते आमच्यासोबत राहतीलच. मात्र आणखी दोन संचालकांसह जिल्ह्यातील इतर नेतेही आमच्या संपर्कात आहेत. ‘थोडे थांबा, काय होते ते पाहा,’ असे मंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.
जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीला वेळेत पोहोचता आले नाही. त्यामुळे पालकमंत्री या नात्याने सतेज पाटील यांची भेट घेतली. साहजिकच ‘गोकुळ’सह इतर राजकारणावर चर्चा झाली.
- आमदार विनय कोरे
आमदार विनय कोरे हे मतदारसंघातील कामांसाठी भेटले. साहजिकच ‘गोकुळ’बाबत चर्चा होणारच. ते आमच्यासोबतच राहतील.
- सतेज पाटील (पालकमंत्री, कोल्हापूर)