मुश्रीफ यांना पालकमंत्रिपद शक्य, सतेज पाटील यांचेही नाव चर्चेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2019 12:17 PM2019-12-31T12:17:43+5:302019-12-31T12:20:21+5:30
कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे.
कोल्हापूर : कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्याने कोल्हापूरचे पालकमंत्रिपद हसन मुश्रीफ यांच्याकडे जाण्याची शक्यता जास्त आहे. या पदासाठी काँग्रेसचे सतेज पाटील व मुश्रीफ यांच्यापैकी कुणाला संधी मिळते याबद्दल लोकांत उत्सुकता आहे.
पालकमंत्रिपद असेल तर जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय यंत्रणा हातात राहते. त्या माध्यमांतून मतदारसंघातील कामेही चांगल्या पद्धतीने करून घेता येतात. निधी वाटपापासून कार्यकर्त्यांना विविध पदांवर संधी देण्याबाबतही हे पद महत्त्वाचे ठरते. यापूर्वीच्या सरकारमध्ये दहा वर्षे काँग्रेसचे हर्षवर्धन पाटील यांच्याकडे ही जबाबदारी होती. त्यावेळीही राष्ट्रवादीने आग्रह धरून त्यांना हे पद मिळाले नव्हते. परंतु, मागच्या भाजपच्या सरकारमध्ये ही जबाबदारी चंद्रकांत पाटील यांनी सांभाळली.
आता नव्या सरकारमध्ये जिल्ह्यांतील तिघांचा समावेश झाला; परंतु त्यातील मुश्रीफ हे एकटेच कॅबिनेट असल्याने त्यांचा या पदावरील दावा जास्त मजबूत मानला जातो. मध्यंतरी त्यांचे नाव सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठीही चर्चेत होते. परंतु, राष्ट्रवादीने तिथे बाळासाहेब पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद दिल्याने हा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे कोल्हापूरसाठी त्यांचा प्राधान्याने विचार होण्याची शक्यता ठळक झाली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ व सतेज पाटील यांची गट्टी असल्याने हे दोघेही पालकमंत्र्यांसारखाच कारभार करणार, हे स्पष्ट आहे.