नगरसेवक गटबाजीला मुश्रीफ-माने वादाची किनार

By Admin | Published: March 2, 2015 09:58 PM2015-03-02T21:58:36+5:302015-03-03T00:34:33+5:30

राष्ट्रवादीतील वाद : समेटासाठी मुंबईत आज होणाऱ्या बैठकीकडे इचलकरंजीवासीयांच्या नजरा

Musharraf-Mane Vaadachi Bank | नगरसेवक गटबाजीला मुश्रीफ-माने वादाची किनार

नगरसेवक गटबाजीला मुश्रीफ-माने वादाची किनार

googlenewsNext

इचलकरंजी : येथील नगरपालिकेत राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील दोन गटांत समन्वय साधण्यासाठी प्रदेश समितीने आज, मंगळवारी मुंबई येथे विशेष बैठक आयोजित केली आहे. या वादाला जिल्हास्तरीय हसन मुश्रीफ व माजी खासदार निवेदिता माने गटातील संघर्षाची किनार असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे मुंबईच्या बैठकीतील निर्णयाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून राहिले आहे.
इचलकरंजी पालिकेची २०११ मधील निवडणूक प्रथमच राष्ट्रवादीने चिन्हावर स्वतंत्रपणे लढविली. परिणामी कॉँग्रेस, राष्ट्रवादी व शहर विकास आघाडी, अशी तिरंगी लढत झाली. ही निवडणूक राष्ट्रवादीकडून स्वतंत्रपणे लढविण्यासाठी तत्कालीन मंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेतला. राष्ट्रवादीतील सर्व गट एकत्रित येऊन त्यावेळी निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले. त्याला शहर विकास आघाडीबरोबर राहिलेल्या लायकर-बुगड गट अपवाद ठरला.
निवडणुकीनंतर दोन्ही कॉँग्रेसने आघाडी करीत पालिकेतील सत्ता काबीज केली. त्यावेळी निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या दहा नगरसेवकांपैकी सात नगरसेवक माने गटाचे होते. त्यामुळे माने गटाचे रवींद्र माने पक्षप्रतोद झाले. एक वर्षानंतर पालिकेतील बांधकाम समितीच्या सभापतिपदी नितीन जांभळे यांची निवड झाली आणि त्यानिमित्ताने माजी आमदार व स्वीकृत नगरसेवक अशोक जांभळे यांचेही पालिकेत वर्चस्व निर्माण झाले. पुढे पोटनिवडणूक होऊन प्रभाग क्रमांक तीनमधून राष्ट्रवादीचे विठ्ठल चोपडे नगरसेवक झाले आणि त्यांच्यात व जांभळे-माने यांच्यात खटके उडू लागले.
आता हा वाद विकोपाला गेला आहे. पक्षप्रतोद माने यांनी नगरसेवकांची बैठक घेऊन नगरसेवक चोपडे यांचे तात्पुरते निलंबन करावे, असा प्रस्ताव संमत केला. तर विधानसभा निवडणुकीत उमेदवाराच्या विरोधात प्रचार केल्याचे कारण दाखवून माने यांना सहा महिने निलंबित करण्याचे पत्र प्रदेश सरचिटणीसांनी दिले आहे. यात हस्तक्षेप करून माजी खासदार निवेदिता माने यांनी रवींद्र माने निलंबनास प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून स्थगिती मिळविली.
दोन्ही गटांत समन्वयासाठी प्रदेशाध्यक्षांनी मंगळवारी सकाळी ११ वाजता बैठक बोलावली आहे. बैठकीस दोन्ही गटांच्या नगरसेवकांसह जिल्हाध्यक्ष के. पी .पाटील, आमदार मुश्रीफ, निवेदिता माने, प्रदेश सचिव मदन कारंडे, आदींना पाचारण केले आहे. (प्रतिनिधी)


माने-जांभळे गटाचा निर्वाणीचा इशारा
या गटबाजीच्या वादाला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅँकेतील अन्नप्रक्रिया व औद्योगिक गटातील उमेदवारीचे कारण पुढे येऊ लागले आहे. या गटात माने-जांभळे यांच्या संपर्कातील संस्थांचे अधिक ‘ठराव’ असल्याने त्यांना डावलण्यासाठी मुश्रीफ गट राजकीय कुरघोड्या करीत आहे; पण मंगळवारच्या बैठकीत एकदाच अंतिम निर्णय द्यावा आणि आम्हाला मोकळीक द्यावी, असा निर्वाणीचा इशारा माने-जांभळे गटाकडून दिला जाणार असल्याचे सांगण्यात येते.

Web Title: Musharraf-Mane Vaadachi Bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.