चंद्रकांत पाटील यांच्यासाठी मुश्रीफ यांची प्रार्थना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2020 11:29 AM2020-01-17T11:29:57+5:302020-01-17T11:32:14+5:30
महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने चंद्रकांत पाटील यांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो, अशी उपरोधिक प्रार्थना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
कोल्हापूर : शिवसेना आणि भाजपचे बहुमत झाल्याने आपण पुन्हा सत्तेत येणार या भ्रमात चंद्रकांत पाटील होते. पुन्हा पाच वर्षे शिवसेनेची ओढाताण करायची आणि आपल्याला पाहिजे तसे करून घ्यायचे, हे त्यांच्या डोक्यात होते; मात्र उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री झाल्याने आणि महाआघाडी सरकार सत्तेत आल्याने पाटील यांना झटका बसला आहे. त्यातून सावरण्याची परमेश्वर त्यांना शक्ती देवो, अशी उपरोधिक प्रार्थना ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
दोन दिवसांपूर्वी पाटील यांनी स्कूटरवरून फिरणाऱ्या हसन मुश्रीफ यांच्याकडे खाजगी कारखाना काढण्याजोगा पैसा कुठून आला, अशी विचारणा केली होती. त्याला उत्तर देताना मुश्रीफ यांनी ही प्रार्थना केली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी ते कोल्हापुरात आले होते. तेव्हा शासकीय विश्रामगृहावर ते पत्रकारांशी बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, सहकारी कारखाना काढण्यापेक्षा खाजगी कारखाना काढणे सोपे झाले आहे. शेतकऱ्यांनी ४0 टक्के रक्कम दिली, की बँका ६0 टक्के कर्ज देतात. त्याच पद्धतीने आमचा साखर कारखाना काढला आहे. आम्ही लोखंडी टायर्स घातल्याने टायर झिजण्याचा प्रश्नच येणार नाही आणि सरकार टिकणारच आहे, असे सांगून पाटील यांच्या सरकार पडणार असल्याच्या दाव्याचीही मुश्रीफ यांनी खिल्ली उडवली.
मुश्रीफ म्हणाले, मुळात आमच्या घरची परिस्थिती पहिल्यापासूनच चांगली होती; त्यामुळे मी लहान असताना तीन चाकी सायकल, मग सायकल, मग मोटारसायकल मी वापरली आहे; त्यामुळे पाटील यांनी यासारखे आरोप याआधीही केले असताना आणि त्याला उत्तर दिले असताना फार काही प्रतिक्रिया देण्याची गरज नाही.
जनतेला सगळं माहिती आहे
‘मी कागल मतदारसंघातून पाचवेळा निवडून आलो आहे; त्यामुळे माझ्या जनतेला माझ्याबद्दल सगळे काही माहिती आहे’, असे सांगून, माझ्या जनतेचा माझ्यावर विश्वास असल्याचे मुश्रीफ यांनी सांगितले.