मुश्रीफ यांच्याकडून जि. प. सदस्यांना २५ लाखांचा निधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:36+5:302021-01-19T04:25:36+5:30
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विरोधकांसह सर्व सदस्यांना ३०५४ योजनेतून प्रत्येकी २५ लाख रुपयांचा ...
कोल्हापूर : ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विरोधकांसह सर्व सदस्यांना ३०५४ योजनेतून प्रत्येकी २५ लाख रुपयांचा निधी जाहीर केला. मुश्रीफ हे सोमवारी दुपारी यशवंतराव चव्हाण पुतळ्याच्या उभारणीच्या कामाची पाहणी करण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते विजय भोजे आणि भाजपचे सदस्य प्रसाद खोबरे यांच्या या निधीमागणीला मुश्रीफ यांना तात्काळ प्रतिसाद दिला.
राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत शुक्रवारी सकाळी १० वाजता चव्हाण यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. या कामाची पाहणी करण्यासाठी मुश्रीफ आले होते. मुश्रीफ यांनी कार्यक्रमाच्या अनुषंगाने काही सूचना केल्या. ते परत जाताना भोजे आणि खोबरे यांनी निधीचा विषय काढला. तेव्हा मुश्रीफ यांनी बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता विजय कांडगावे यांना बोलावून प्रत्येक सदस्याला ३०५४ मधून २५ लाख रुपये देणार असल्याचे सांगितले. शासनाकडून विशेष रस्ता दुरूस्तीसाठी हा निधी दिला जातो. विरोधी सदस्यांच्या मागणीला मुश्रीफ यांनी दिलेल्या तत्काळ प्रतिसादामुळे सदस्यही अवाक् झाले.