मुश्रीफ यांनी लावली भाजपच्या काळातील खरेदीची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2020 04:58 PM2020-06-19T16:58:23+5:302020-06-19T16:59:37+5:30
भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
कोल्हापूर- भाजप, जनसुराज्य, शिवसेनेच्या काळात जिल्हा परिषदेत झालेल्या खरेदीची चौकशी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी लावली आहे. चार दिवसांपूर्वीच मुश्रीफ यांनी ही चौकशी लावणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार गुरुवारी शासन आदेश काढण्यात आला असून, ग्रामविकास विभागाचे उपसचिव उदय जाधव यांनी चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
सध्या वॉटर एटीएमच्या खरेदीचा विषय गाजत असून गावांची निकड आणि निवड यांची सांगड न घालता ही गावे निवडण्यात आली. अनेक ठिकाणी ही एटीएम बंद आहेत. निविदेप्रमाणे साहित्याचा वापर न करणे अशा अनेक कारणांमुळे याबाबत सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा झाली होती. गेल्यावर्षी तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीमधून यासाठी निधी दिला होता. मात्र जानेवारी २०२० मध्ये सत्तांतर होऊन जिल्हा परिषदेत दोन्ही कॉंग्रेससह शिवसेनेची सत्ता आली आहे.
परिणामी राजकीय संदर्भही बदलले आहेत. पंचगंगा नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठीचा उपाय म्हणून घनकचरा व्यवस्थापन यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र काही गावांनी ही यंत्रणाच वापरलेली नाही. त्यामुळे या यंत्रणेच्या खरेदीचीही चौकशी आता होणार आहे.
चौदाव्या वित्त आयोगातून नेमकी काय खरेदी करावी याचे निकष दिले असताना अनेक ग्रामपंचायतींना टीव्ही, ई-लर्निंगचे साहित्य खरेदी करण्यास सांगण्यात आले होते. शासनाने घालून दिलेल्या निकषांना डावलून ही खरेदी झाली आहे का, याचीही चौकशी आता होणार आहे. हे सर्व विषय ग्रामीण पाणीपुरवठा, यांत्रिकी, पाणी व स्वच्छता आणि ग्रामपंचायत विभागाशी संबंधित असल्याने आता या सर्व खरेदी प्रक्रियांची चौकशी केली जाणार आहे.
या सर्व प्रकरणांची वस्तुस्थिती, उपलब्ध कागदपत्रे आणि कामाची स्थळपाहणी करून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केलेल्या कामाबाबत चौकशी करावी, असे या चौकशी आदेशामध्ये नमूद करण्यात आले आहे. चौकशी अधिकारी उदय जाधव यांना या प्रकरणांची सर्व कागदपत्रे आणि स्थळपाहणीसाठी सर्व यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, असेही आदेशात म्हटले आहे.
वस्तुस्थिती बाहेर येईल
भाजपच्या गेल्या तीन काळात झालेल्या खरेदीची ही चौकशी आहे. सदस्यांच्या या कामांबाबत अनेक तक्रारी होत्या. त्यामुळे आता या चौकशीमधून वस्तुस्थिती बाहेर येईल आणि जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चितच कारवाईही होईल, असा विश्वास आहे, अशी प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील यांनी व्यक्त केली आहे.