‘मुश्रीफ, पी. एन., सतेज ’ यांची मुंबईत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:46 AM2021-03-04T04:46:57+5:302021-03-04T04:46:57+5:30
(हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील फोटो वापरावेत) लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ...
(हसन मुश्रीफ, सतेज पाटील, पी. एन. पाटील फोटो वापरावेत)
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुधवारी दुपारी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील व आमदार पी. एन. पाटील यांच्यात मुंबईत बैठक झाली. माजी आमदार महादेवराव महाडीक हेच चर्चेचे केंद्रबिंदू राहिल्याचे समजते. तिन्ही नेत्यांमध्ये निवडणुकीबाबत प्राथमिक चर्चा होऊन १२ मार्चनंतर पुन्हा बसण्याचा निर्णय घेण्यात आला.
‘गोकुळ’ च्या सत्तासंघर्षात ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या भूमिकेला महत्त्व आले आहे. मागील निवडणुकीत मंत्री मुश्रीफ हे सत्तारूढ गटासोबत राहिले. गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत दोन जागा जिंकल्या होत्या. मात्र पाच वर्षात ‘गोकुळ’ विरोधातील संघर्षात मंत्री मुश्रीफ हे सतेज पाटील यांच्या सोबत राहिले. मुश्रीफ यांनी आपल्या सोबत रहावे, यासाठी सत्तारूढ गटाचा प्रयत्न आहे. दोन्ही नेते अधिवेशनामुळे मुंबईत असल्याने बुधवारी दुपारी मंत्री मुश्रीफ यांच्या निवासस्थानी आमदार पाटील, गृहराज्यमंत्री पाटील यांच्यात बैठक झाली.
यामध्ये, माजी आमदार महादेवराव महाडीक हेच केंद्रबिंदू राहिल्याचे समजते. तिघे एकत्र राहूया, असा प्रस्ताव पुढे आला असला तरी त्यातही राजकीय ॲलर्जीचा मुद्दा पुढे आल्याचे समजते. ‘गोकुळ’ची अंतिम मतदार यादी १२ मार्चला प्रसिध्द होत आहे. त्यानंतर पुन्हा बसूया, असा निर्णय झाला.
एकत्र येण्यासाठी जागांचे त्रांगडे
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी गेल्या वेळेला १८ जागा लढविल्या होत्या. प्रत्येक तालुक्यात त्यांचा गट सक्रिय आहे. त्यामुळे तिन्ही नेते एकत्र आले तरी जागांचे त्रांगडे होणार हे निश्चित आहे. उद्या, एकमेकांना विचारले नाही, असे आक्षेप घेऊ नयेत, यासाठीच बैठक असल्याचे बोलले जाते.