आजराच्या संचालकांचे मुश्रीफांनी टोचले कान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:17 AM2021-06-29T04:17:41+5:302021-06-29T04:17:41+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : आजरा तालुक्यातील शेतकरी आणि कामगारांचा विचार करून जे ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : आजरा तालुक्यातील शेतकरी आणि कामगारांचा विचार करून जे काम होणार नव्हते ते केले आहे. यापुढच्या काळात तरी नीट कारभार करा. मासिक बैठकांचा भत्ता बंद करा. घरातून जेवणाचा डबा आणून झाडाखाली जेवा, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी आजरा साखर कारखान्याच्या सर्व संचालकांचे रविवारी कान टोचले.
आजरा कारखान्याच्या कर्जाचा प्रश्न मार्गी लावतानाच मुश्रीफ यांनी आजरा साखर कारखान्याच्या कामगार संघटनेशी आणि सर्व संचालक मंडळाशी चर्चा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार रविवारी त्यांनी पहिल्यांदा कामगार संघटनेशी चर्चा केली. मासिक पगारामध्ये ५० टक्के कपात मान्य केल्याबद्दल त्यांनी पहिल्यांदा कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले; परंतु तीन वर्षांऐवजी ही कपात पाच वर्षे ठेवावी, अशी सूचना त्यांनी केली. अखेर तीन वर्षांनंतर कारखान्याच्या आर्थिक स्थितीचा आढावा घेऊन मग पुढच्या दोन वर्षांंबाबत निर्णय घ्यावा, असे ठरवण्यात आले.
यानंतर संचालक मंडळाशी चर्चेवेळी मुश्रीफ यांनी सर्वच संचालक मंडळाला खडे बोल सुनावले. कोणत्या परिस्थितीत कारखान्यासाठी मार्ग काढला आहे हे लक्षात घ्या. केवळ आजरा तालुक्यातील शेतकरी आणि कामगार यांचा विचार करून हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता कारखाना चांगल्या पद्धतीने चालवून दाखवा. बैठकांचा भत्ता बंद करा. कारखान्यावर अजिबात जेवणं करू नका. घरातून डबे आणा आणि झाडाखाली बसून जेवा. शेतकऱ्यांना एक चांगला संदेश यातून द्या.
यावेळी अध्यक्ष सुनील शिंत्रे, उपाध्यक्ष आनंदा कुलकर्णी, संचालक अशोक चराटी, विष्णू केसरकर, वसंतराव धुरे, मुकुंद देसाई, जनार्दन टोपले, अंजना रेडेकर, मधुकर देसाई, दिगंबर देसाई, सुधीर देसाई, लक्ष्मण गुडुळकर, दशरथ अमृते, राजेंद्र सावंत, अनिल फडके, विजयालक्ष्मी देसाई, आनंदा कांबळे, तानाजी देसाई, सुनीता रेडेकर उपस्थित होते.
चौकट
अर्धा कप चहा पिऊन उठायचं
याआधी झाला तसा कारभार अजिबात चालणार नाही. डिझेल टाकतो, ड्रायव्हर नेतो हे सगळं बंद व्हायला पाहिजे. तरच मी तुमच्याबरोबर आहे. इकडंचं तिकडं मला चालणार नाही.
अर्धा कप चहा पिऊन तिथूनं उठायचं अशा भाषेत मुश्रीफ यांनी सर्वच संचालकांना सुनावले.