जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी मुश्रीफच
By admin | Published: May 21, 2015 12:42 AM2015-05-21T00:42:55+5:302015-05-21T00:44:29+5:30
शिक्कामोर्तब आज : उपाध्यक्षपदी काँग्रेसच्या गाताडेंना संधी शक्य
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार हसन मुश्रीफ यांची निवड निश्चित मानली जात आहे. उपाध्यक्षपदी काँग्रेसचे विलास गाताडे यांचे नाव आघाडीवर असून आज, गुरुवारी होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत यावर शिक्कामोर्तब होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकत्रित येऊन निवडणूक लढविली होती. त्यामध्ये त्यांनी निर्विवाद वर्चस्व राखले. संचालक मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे आठ, काँग्रेसचे सहा, जनसुराज्य दोन, शिवसेना व भाजप प्रत्येकी एक असे बलाबल आहे. नरसिंगराव पाटील व अशोक चराटी यांनी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने त्यांची संख्या आठपर्यंत पोहोचली आहे.
त्यामुळे अध्यक्ष कोण होणार, याविषयी गेले आठ-दहा दिवस जोरदार चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीकडून आमदार हसन मुश्रीफ स्वत:च तर काँग्रेसकडून पी. एन. पाटील अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत. याबाबत आज दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांची बैठक शासकीय विश्रामगृह येथे झाली. त्यामध्ये पी. एन. पाटील व आमदार मुश्रीफ यांनी संचालकांची मते आजमावून घेतली. त्यानंतर आमदार महादेवराव महाडिक, पी. एन. पाटील, आमदार मुश्रीफ व के. पी. पाटील यांनी स्वतंत्र खोलीत चर्चा केली. यावेळी दोन-दोन वर्षे अध्यक्षपद देण्यावर एकमत झाले, पण पहिल्यांदा कोण? यावर घोडे अडले आहे. पहिल्यांदा आपणालाच संधी द्यावी, म्हणून पी. एन. आग्रही आहेत, पण मुश्रीफ स्वत:साठीच आग्रही राहिल्याने निर्णय होऊ शकला नाही. गुरुवारी (दि. २१) सकाळी दहा वाजता श्रीपतरावदादा बँकेत दोन्ही काँग्रेसच्या संचालकांची बैठक होणार असून तिथेच अध्यक्षपदाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे आमदार मुश्रीफ व पी. एन. पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्ष झाला पाहिजे, यासाठी थेट माजी उपमुख्यमंत्री अजित पवार
यांनी विनय कोरे यांना सूचना
केल्याचे समजते. परंतू त्यास अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही. उपाध्यक्षपदासाठी विलास गाताडे व राजू आवळे यांच्यापैकी एकाची वर्णी लागणार आहे. (प्रतिनिधी)
मतदान झाले तर पी एन-पेरिडकर यांना संधी
आजच्या बैठकीला जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते
विनय कोरे, सर्जेराव पाटील-पेरिडकर हे संचालक उपस्थित नव्हते. त्यामुळे कोरे यांची भूमिका गुलदस्त्यात आहे.
परंतु मिळालेल्या माहितीनुसार कोरे यांचा राष्ट्रवादीला अध्यक्षपद देण्यास विरोध आहे. परंतु ते उघडपणे तशी भूमिका घ्यायला तयार नाहीत. त्यांनी तसे ठरवले तर मग मात्र चित्र एकदमच बदलू शकते व काँग्रेसचे पी.एन.पाटील अध्यक्ष व जनसुराज्यचे सर्जेराव पाटील पेरिडकर हे उपाध्यक्ष होऊ शकतात.
या घडामोडीही समांतर पातळीवर रात्री उशिरा सुरु होत्या. मुश्रीफ-कोरे यांचे मैत्रीचे संबंध पाहता ते कितपत याबाबत स्पष्टपणे भूमिका घेतात यावरच या सगळ््या बाबी अवलंबून आहेत.
राष्ट्रवादी नकोच : भाजप
जिल्हा बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीला द्यायचे नाही. काँग्रेसने आपला अध्यक्ष करावा, बॅँकेला सरकारकडून लागेल ती मदत करण्याची ग्वाही सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आमदार महादेवराव महाडिक यांना सकाळी फोन करुन दिल्याचे सूत्रांकडून समजते.
काँग्रेसच्या खेळीवर राष्ट्रवादी सावध
काँग्रेसने गेले दोन दिवस आपणाला मानणाऱ्या संचालकांशी संपर्क ठेवला होता. बुधवारी दुपारीही आठ संचालकांची स्वतंत्र बैठक घेतल्याने राष्ट्रवादी काँग्रेस सावध झाली. त्यांनीही सूत्रे हलवण्यास सुरुवात केली.
चराटी, अप्पींचा
राष्ट्रवादीला विरोध
अशोक चराटी व अप्पी पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष करण्यास विरोध दर्शविला. श्रीपतरावदादा बँकेत त्यांनी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांना तसे बोलून दाखवले. राष्ट्रवादीच्याच काही संचालकांचीही पडद्याआड हीच भूमिका होती.