मुश्रीफ साहेब, शाहू महाराजांचा वारसा कसा विसरलात?, रोहित पवार यांची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2023 02:02 PM2023-07-08T14:02:17+5:302023-07-08T14:25:55+5:30
अडचणीच्या काळात साथ नव्हे हात दाखवला
कोल्हापूर : धर्मांध महाशक्तीने यंत्रणांचा वापर करत त्रास देऊनही मंत्री हसन मुश्रीफ याच शक्तीच्या मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यामुळे ते खऱ्या अर्थाने कोल्हापूरकर व शाहू महाराजांचा वैचारिक वारसा विसरलेत या शब्दात आमदार रोहित पवार यांनी मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवली.
मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून ओळखले जात होते. मात्र, दोनच दिवसांपूर्वी त्यांनी सत्ताधारी भाजपबरोबर हातमिळवणी करत मंत्रिमंडळात शपथ घेतली. या पार्श्वभूमीवर आमदार पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत शरद पवार यांच्यामुळे मुश्रीफांना काय- काय मिळाले याचा लेखाजोखाच मांडला. या पोस्टमध्ये आमदार पवार म्हणतात, 'शरद पवार यांच्या मागर्दशनाखाली तुम्ही कोल्हापूरमध्ये सर्वांना सोबत घेऊन सर्वधर्म समभाव जोपासत काम करत होतात.
पण, ज्या महाशक्तीने त्यांच्या ताब्यातील यंत्रणांचा गैरवापर करत तुम्हाला प्रचंड त्रास दिला, धार्मिक सलोखा उद्ध्वस्त करून तेढ निर्माण करायची आणि सत्ता मिळवायची हे ज्यांचे धोरण आहे अशा शक्तीच्या मांडीला मांडी लावून तुमच्यासारखी व्यक्ती जाऊन बसते तेव्हा कोल्हापूरकरांचा आणि राजर्षी शाहू महाराजांचा वैचारिक वारसा आपण कसा विसरलात, असा प्रश्न पडतो'.
'अजून काय पाहिजे'
पक्षाचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा म्हणून शरद पवार यांनी तुमच्याकडे विश्वसाने सूत्रे दिली, मानसन्मान राखला, नेहमीच पदे दिली. आपल्या विजयासाठी जिवाचे रान केले. अडचणीच्या काळात ते तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. आम्हालाही तुमचा अभिमान वाटायचा. पण, अडचणीच्या काळात शरद पवार यांना साथ देण्याऐवजी तुम्ही हात दाखवला, या शब्दांत आमदार पवार यांनी मुश्रीफांच्या भाजपबरोबर जाण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली.