मुश्रीफ, सतेज पाटील यांचे एकाच दगडात अनेक पक्षी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:26 AM2021-07-14T04:26:32+5:302021-07-14T04:26:32+5:30

लाेकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : राहुल पाटील यांना अध्यक्षपदी संधी देऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील ...

Mushrif, Satej Patil's many birds in one stone | मुश्रीफ, सतेज पाटील यांचे एकाच दगडात अनेक पक्षी

मुश्रीफ, सतेज पाटील यांचे एकाच दगडात अनेक पक्षी

Next

लाेकमत न्यूज नेटवर्क

काेल्हापूर : राहुल पाटील यांना अध्यक्षपदी संधी देऊन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ व पालकमंत्री सतेज पाटील यांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. आगामी विधानपरिषद, जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीची किनार या निवडीला आहे. त्याचबरोबर अध्यक्ष, उपाध्यक्ष निवडीच्या निमित्ताने कोल्हापुरात महाविकास आघाडी भक्कम असल्याचा संदेश दोन्ही मंत्र्यांना वरिष्ठांना द्यायचा होता, त्यातही यश मिळाले.

महाविकास आघाडीचे सदस्य दोन दिवस पन्हाळ्यावर होते. नेत्यांनी रविवारी सदस्यांशी चर्चा केल्यानंतर सोमवारी सकाळी आठ वाजल्यापासून चर्चेचे केंद्रस्थान हे शासकीय विश्रामगृहच राहिले. पालकमंत्री सतेज पाटील हे सकाळी आठ वाजताच विश्रामगृहावर आले. त्यांच्यापाठोपाठ साडेआठ वाजता ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ आले. दहा मिनिटातच आमदार पी. एन. पाटील, आमदार राजेश पाटील तिथे हजर झाले, या नेत्यांसह राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने यांच्या उपस्थितीत अध्यक्ष, उपाध्यक्ष पदांच्या नावावर चर्चा झाली. तब्बल अडीच तास चर्चा झाल्यानंतर नावांची घोषणा करण्यात आली.

युवराज पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये संधी

अध्यक्ष, उपाध्यक्षांनी राजीनामे दिल्यापासून अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार आणि युवराज पाटील यांना संधी मिळणार, अशीच राष्ट्रवादीमध्ये चर्चा होती. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी अध्यक्ष राष्ट्रवादीचाच हाेईल, असे सांगितल्याने पाटील यांच्या नावाला बळकटी मिळाली होती. मात्र, ऐनवेळी राहुल पाटील यांनी बाजी मारली. युवराज पाटील यांना ‘गोकुळ’मध्ये स्वीकृत संचालक म्हणून घेतले जाणार आहे.

तर दुरंगी लढत झाली असती

महाविकास आघाडीच्या चर्चेचे केंद्र शासकीय विश्रामगृह तर भाजपचे पंचशील हॉटेल होते. राहुल पाटील सोडून इतर नाव अध्यक्षपदासाठी पुढे आले असते तर भाजपने उमेदवारी अर्ज दाखल करण्याची तयारी केली होती.

आवाडे यांनी हीच भूमिका पहिल्या वर्षी घेतली असती तर

राहुल पाटील हे अध्यक्षपदाचे उमेदवार असतील तर आपल्या दोन सदस्यांचा पाठिंबा राहील, असे आमदार प्रकाश आवाडे यांनी जाहीर केले होते. हीच भूमिका त्यांनी पहिल्यावर्षी घेतली असती तर राहुल पाटील हे अडीच वर्षे अध्यक्ष राहिले असते, अशी चर्चा काॅंग्रेस समर्थकांत होती.

Web Title: Mushrif, Satej Patil's many birds in one stone

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.