मुश्रीफ-शिंदे गटाकडे ‘गोडसाखर’

By admin | Published: March 30, 2016 01:37 AM2016-03-30T01:37:24+5:302016-03-30T01:39:52+5:30

गडहिंग्लज कारखाना निवडणूक : ११ जागा जिंकल्या; शहापूरकर गटाला ८ जागा, अप्पी पाटील, संग्रामसिंह कुपेकर पराभूत

Mushrif-Shinde group gets 'Godsakhar' | मुश्रीफ-शिंदे गटाकडे ‘गोडसाखर’

मुश्रीफ-शिंदे गटाकडे ‘गोडसाखर’

Next

गडहिंग्लज : अतिशय चुरशीच्या झालेल्या हरळी बुद्रुक (ता. गडहिंग्लज) येथील आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याच्या (गोडसाखर) पंचवार्षिक निवडणुकीत माजी मंत्री हसन मुश्रीफ व श्रीपतराव शिंदे यांच्या शेतकरी विकास पॅनेलने १९ पैकी ११ जागा जिंकत सत्ता काबीज केली, तर विरोधी डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश चव्हाण, भाजप, शिवसेना व इतर पक्षांच्या काळभैरी शेतकरी विकास पॅनेलला ८ जागा मिळाल्या.
रात्री १ वाजता शेवटच्या एका जागेचा निकाल जाहीर झाला. या निवडणुकीत कारखान्याचे माजी अध्यक्ष श्रीपतराव शिंदे, डॉ. प्रकाश शहापूरकर यांच्यासह प्रकाश चव्हाण, संग्रामसिंह नलवडे, सदानंद हत्तरकी यांनी विजय संपादन केला, तर जिल्हा बॅँकेचे उपाध्यक्ष अप्पी पाटील, शिवसेनेचे संग्रामसिंह कुपेकर, उदय चव्हाण, आदींना धक्कादायक पराभव पत्करावा लागला.
सकाळी साडेआठच्या सुमारास संस्था गटातील पहिला निकाल हाती आला. त्यात शहापूरकर पॅनेलच्या सदानंद हत्तरकी यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ कौलगे-कडगाव गटातून स्वत: डॉ. शहापूरकर व अनंत कुलकर्णी यांनी बाजी मारली. त्यामुळे शहापूरकरांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष केला.
दरम्यान, गडहिंग्लज-हनिमनाळ गटातून शिंदे-मुश्रीफ पॅनेलच्या संग्रामसिंह नलवडे, विद्यमान संचालक बाळासाहेब मोरे यांनी बाजी मारली. त्यापाठोपाठ भडगाव-मुगळी गटातून अमर चव्हाण व सतीश पाटील यांनी बाजी मारली, तर ‘काळभैरी’चे प्रकाश चव्हाण यांनाही पुन्हा संधी मिळाली.
नूल-नरेवाडी गटातून माजी अध्यक्ष शिंदे हे एकमेव विजयी झाले, तर ‘काळभैरी’मधून सुभाष शिंदे व विद्यमान संचालक किरण पाटील विजयी झाले. महागाव-हरळी गटात शिंदे-मुश्रीफ आघाडीचे विद्यमान संचालक प्रकाश पताडे यांच्यासह दीपक जाधव व विद्याधर गुरबे विजयी झाले.
दरम्यान, रविवारी चुरशीने झालेल्या या तिरंगी निवडणुकीत सरासरी ८० टक्के मतदान झाले होते. त्याचवेळी संमिश्र कौल मिळण्याचे संकेत मिळाले होते.
१९ जागांसाठी तीन प्रमुख पॅनेलसह ३० अपक्ष मिळून तब्बल ८७ उमेदवार रिंगणात होते. ऊस उत्पादक गटातील एकूण २३,९२४ पैकी १९,०४१ सभासदांनी, तर संस्था गटातील १८८ पैकी १८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला होता.


गडहिंग्लज साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुज्ञ सभासदांनी प्रस्थापितांच्या विरोधात कौल दिला आहे. हा साखर कारखाना म्हणजे आपली खासगी जहागिरी समजणाऱ्या प्रवृत्तींना आम्ही घाम फोडला. स्वाभिमानी संघटनेने अवसानघातकीपणा केला नसता तर चित्र आणखी वेगळे दिसले असते.
- चंद्रकांतदादा पाटील
पालकमंत्री व विरोधी काळभैरव पॅनेलचे प्रमुख नेते

शेतकरी पॅनेलचे विजयी उमेदवार
अ‍ॅड़ श्रीपतराव दिनकरराव शिंदे, संग्रामसिंह आप्पासाहेब नलवडे, सतीश भीमगोंडा पाटील, अमर रामचंद्र चव्हाण, विद्याधर बाबूराव गुरबे, प्रकाश धोंडिबा पताडे, बाळकृष्ण विष्णू परीट, जयश्री सचिन पाटील, सागर राजशेखर हिरेमठ, बाळासाहेब बंडू मोरे, दीपक भैयासो जाधव.

काळभैरी शेतकरी विकास पॅनेलचे विजयी उमेदवार
डॉ. प्रकाश शहापूरकर, प्रकाश भीमराव चव्हाण, सुभाष नारायण शिंदे, किरण मलगोंडा पाटील, सदानंद हत्तरकी, संभाजी नाईक, अनंत कुलकर्णी, क्रांतिदेवी किसनराव कुराडे.

Web Title: Mushrif-Shinde group gets 'Godsakhar'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.