मुश्रीफजी ‘गडहिंग्लज’साठी एवढं कराच..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 05:23 AM2021-01-08T05:23:33+5:302021-01-08T05:23:33+5:30
राम मगदूम। गडहिंग्लज : गोवा व कोकणचे प्रवेशद्वार, कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण राजधानी असणाऱ्या गडहिंग्लजमधील क्रीडासंकुल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि ...
राम मगदूम। गडहिंग्लज : गोवा व कोकणचे प्रवेशद्वार, कोल्हापूर जिल्ह्याची दक्षिण राजधानी असणाऱ्या गडहिंग्लजमधील क्रीडासंकुल, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत आणि प्रांतकचेरीच्या जागेचा वाद, एमआयडीसीमध्ये नवे उद्योग आणणे हे गडहिंग्लजचे प्रमुख चार प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी स्वत: लक्ष घालून ही कामे मार्गी लावावीत, अशी जनतेची आग्रही मागणी आहे. स्व. बाबासाहेब कुपेकर यांच्या प्रयत्नामुळे गडहिंग्लजची एमआयडीसी, क्रीडासंकुल व मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीला मंजुरी मिळाली. परंतु, गेल्या दोन दशकांपासून हे सर्व प्रश्न जैसे थे आहेत. त्यामुळे गडहिंग्लज शहरासह तालुक्याच्या विकासाची मोठी कोंडी झाली आहे. ‘एमआयडीसी’मध्ये गारमेंट प्रकल्प आणून महिला व तरुणांना रोजगार देण्याची घोषणा मुश्रीफांनी अनेकदा केली आहे. परंतु, त्या दृष्टीने अद्याप काही हालचाली दिसत नाहीत. उशाला असणाऱ्या पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गासह कोकण रेल्वे आणि कोल्हापूर व बेळगावची विमानसेवा उपलब्ध असूनही ही एमआयडीसी उद्योगांच्या प्रतीक्षेत आहे. १० एकर जागा, १० लाखांचा निधी मिळूनही तालुका क्रीडासंकुलाचे काम १० वर्षे रखडले आहे. ते तातडीने सुरू करण्याची गरज आहे. भाडोत्री इमारतीमधील आणि अडगळीतील सर्व शासकीय कार्यालये एकाच छताखाली यावीत म्हणून कुपेकरांनी प्रशासकीय इमारतीला मंजुरी आणली; परंतु, जागेअभावी तेही रखडलेले आहे. पालिकेने आरक्षित ठेवलेल्या जागेवर हे भवन उभारल्यास ग्रामीण जनतेची मोठी सोय होईल. ६० वर्षांपूर्वी नगरपालिकेने महसूल खात्याला ‘गडहिंग्लज प्रांतकचेरी’साठी भाड्याने दिलेली मोक्याची जागा पाच वर्षांपूर्वी तत्कालीन प्रांताधिकाऱ्यांनी बेकायदा महसूलच्या नावावर करून घेतली आहे. त्या जागेसह नगरपालिका कार्यालय आणि वाचनालयाच्या जागेवर बहुमजली व्यापारी संकुल बांधून गडहिंग्लज पालिकेला आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण करता येईल. त्यासाठी मुश्रीफांनी पुढाकार घेण्याची गरज आहे.
............................................
तत्कालीन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी परत घेतलेले नाट्यगृहाचे पाच कोटी, कचेरी रोड दर्ग्याचे ५० लाख व लक्ष्मी मंदिर परिसर विकासाचे सव्वा कोटी परत मिळवून द्या. सांडपाणी व कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी भरीव निधी द्या.
१०० खाटांच्या रुग्णालयात कायमस्वरूपी स्त्रीरोगतज्ज्ञ, हृदयरोगतज्ज्ञांची नेमणूक करा.
स्वच्छ-सुंदर, सलोखा व शांतताप्रिय गडहिंग्लजनगरीला स्वयंपूर्ण बनविण्यासाठी पुढाकार घ्या.
--------------------------
* हसन मुश्रीफ यांचा फोटो वापरावा.