मुश्रीफ यांना ‘भाजप’ची आॅफर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2019 12:57 AM2019-07-20T00:57:28+5:302019-07-20T00:57:45+5:30
गडहिंग्लज : राज्यात काँग्रेसची आघाडी पुन्हा सत्तेवर येणारच नाही, इतके काम आम्ही पाच वर्षांत नक्कीच केले आहे. मग तुम्ही ...
गडहिंग्लज : राज्यात काँग्रेसची आघाडी पुन्हा सत्तेवर येणारच नाही, इतके काम आम्ही पाच वर्षांत नक्कीच केले आहे. मग तुम्ही आणखी पाच वर्षे का वाया घालवता ? दोन्ही काँगे्रसच्या १० आमदारांची यादी तयार आहे. तुम्ही आलात तर अकरावे. सोलापुरात बोललो ते खरंच आहे. मी बोलतो ते करून दाखवतो, असा दावा करीत भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार हसन मुश्रीफ यांना येथे शुक्रवारी भाजप प्रवेशाची थेट आॅफर दिली.
निमित्त होतं मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत साकारण्यात आलेल्या गडहिंग्लज विभागातील सौरऊर्जा प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभाचे. ‘म्हाडा’चे अध्यक्ष व भाजपचे कागल मतदारसंघातील संभाव्य उमदेवार समरजित घाटगे यांच्यासमोरच त्यांनी मुश्रीफ यांना दिलेल्या ‘आवतना’मुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या. नुसती आॅफर देऊनच मंत्री पाटील थांबले नाहीत. त्यांनी मुश्रीफ यांचे गुणगान गायिले. ते म्हणाले, मुश्रीफ हे अनुभवी आणि अल्पसंख्याक समाजातील मातब्बर नेते आहेत. गिरीश महाजन यांच्याप्रमाणे त्यांचेही वैद्यकीय क्षेत्रातील काम मोठे आहे. त्यांच्यासारखा सहृदयी माणूस उभ्या महाराष्ट्रात मी पाहिला नाही. काही झाले तरी पुन्हा भाजपचेच राज्य येणार आहे; त्यामुळे तुमची पुढची पाच वर्षे वाया जातील व तुमची सत्ता पुन्हा येईपर्यंत तुम्ही म्हातारे व्हाल म्हणून भाजपमध्ये या.
मंत्री पाटील यांच्या आॅफरबद्दल बोलताना आमदार मुश्रीफ म्हणाले, मंत्री पाटील सोलापुरात काल
बोलले. परंतु, मी त्यात नाही. माझ्यासारखा कर्तबगार मुस्लिम चेहरा ‘भाजप’मध्ये हवा म्हणून त्यांनी
मला अत्यंत विनयाने सांगितले
होते; परंतु, काही चांगले विरोधक राजकारणात हवेत. सगळी पृथ्वी नि:क्षत्रीय करू नका, असा सल्ला आपण त्यांना दिला आहे. मी
त्यांना शुभेच्छा देऊ शकत नाही, कारण मी त्यांच्या उलट्या पक्षाचा आहे. प्रदेशाध्यक्ष झाल्याबद्दल
मी त्यांचे मनापासून अभिनंदन
करतो. त्यांनी चांगले काम करावे. मुख्यमंत्री आमचा की तुमचा यावरून ‘भाजपा-शिवसेने’त जुगलबंदी
सुरू आहे; परंतु, ‘आमचं दोघांचं
ठरलं आहे, जिल्ह्याच्या विकासासाठी एकमेकांच्या हातात हात घालून
काम करू आणि कोल्हापूर जिल्हा राज्यात नंबर वन होण्यासाठी प्रयत्न करू.
चंदगडमध्येही ‘माळ’
लोकसभा निवडणुकीत ‘म्हाडा’ व ‘सांगली’बाबत जे बोललो ते करून दाखविले; त्यामुळेच आमच्याकडे यायला इच्छुकांची माळ लागली आहे. तशीच माळ ‘चंदगड’मध्येही आहे. त्या सर्वांना एका माळेत बांधू, असेही मंत्री पाटील यांनी स्पष्ट केले. त्यांच्या या विधानाने नंदाताई बाभूळकर यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेला बळ मिळाले आहे.
नशीब फळफळले...
मंत्री पाटील यांच्या राशीत ‘राहू-केतू’ एकत्र आहेत. म्हणूनच त्यांचे नशीब फळफळले आहे. पाच वर्षांत एखाद्या राजकारण्याची किती प्रगती व्हावी, याचे ते उत्तम उदाहरण आहेत, अशी टिपणीही मुश्रीफ यांनी यावेळी केली.