महाडिकांच्या माघारीसाठी मुश्रीफांचा पुढाकार
By admin | Published: December 12, 2015 12:48 AM2015-12-12T00:48:01+5:302015-12-12T00:51:22+5:30
विधानपरिषद निवडणूक : सतेज पाटील-महादेवराव महाडिक यांची आज भेट घडविणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील टोकाचे राजकीय वैर संपविण्यासाठी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सतेज पाटील यांनाच पाठिंबा देऊन उमेदवारी अर्ज मागे घ्यावा, अशी विनंती आमदार महादेवराव महाडिक यांच्याकडे करणार आहे. माघारीसाठी सतेज पाटील यांना घेऊन आज, शनिवारी महादेवराव महाडिक यांच्याकडे जाणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते व आमदार हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले.विधानपरिषद निवडणुकीचे काँग्रेसचे उमेदवार सतेज पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित बैठकीत मुश्रीफ बोलत होते. माजी मंत्री आमदार पतंगराव कदम अध्यक्षस्थानी होते. येथील ड्रीमवर्ल्डमध्ये ही बैठक झाली. माजी राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील, शाहू साखर कारखान्याचे अध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा विमल पाटील, पेठवडगावच्या नगराध्यक्षा विद्याताई पोळ, माजी आमदार संजीवनीदेवी गायकवाड, महापौर अश्विनी रामाणे, उपमहापौर शमा मुल्ला प्रमुख उपस्थित होत्या.मुश्रीफ म्हणाले, ‘निवडणुका येतात आणि जातात; परंतु त्यात राजकीय वैर असू नये, असे मी खासदार धनंजय महाडिक यांना दोन दिवसांपूर्वी शासकीय विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सांगितले. पाटील आणि महाडिक या दोघांचे किती दिवस राजकीय वैर ठेवणार, असेही त्यांना विचारले आहे. कधीतरी हा वाद मिटवायला हवा. वाद मिटविण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. काँग्रेसची उमेदवारी सतेज पाटील यांना मिळाली त्यावेळी मी नागपूरला होतो. मला उमेदवारी मिळाली आहे अर्ज भरण्यासाठी या, अशी विनंती खासदार महाडिक आणि महादेवराव यांना करण्याचा सल्ला मी सतेज पाटील यांना दिला.
नागपूरहून आल्यानंतर मी विचारणा केली तर त्यांनी मी तशी विनंती केल्याचे सतेज पाटील यांनी सांगितले. मात्र, अजून मला महाडिक यांच्याकडून यासंबंधी माहिती कळालेली नाही. महादेवराव तीनवेळा विधान परिषदेचे आमदार झाले आहेत. त्यामुळे यावेळी मोठ्या मनाने माघार घेऊन सतेज पाटील यांना पाठिंबा देऊन निवडणूक बिनविरोध करावी, यासाठी आग्रह धरणार आहे.
जिल्ह्णाच्या राजकारणात विनय कोरे आणि माझी मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे पाठिंब्यासंबंधी आज, शनिवारी कोरे यांच्याशी बैठक होईल. त्यानंतर निर्णय जाहीर करू. कागल तालुक्यातील राजे, मंडलिक, घाटगे गटांनी सतेज पाटील यांना पाठिंबा देण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे कागल तालुका शंभर टक्के सतेज पाटील यांच्या पाठीशी राहील. भाजपने अनेक आमिषे दाखवलेली असताना महानगरपालिकेत काँग्रेससोबत राष्ट्रवादी राहिली. यावेळीही राष्ट्रवादी सतेज यांच्यासोबत भक्कमपणे उभा राहील, अशी ग्वाही मुश्रीफ यांनी दिली.जिल्हा परिषद सदस्य अरुण इंगवले म्हणाले, ‘महापालिकेत काँगे्रसला राष्ट्रवादी हवी मग जिल्हा परिषदेत का नको? असंगाशी संग सोडून जिल्हा परिषदेतही काँग्रेसने राष्ट्रवादीला सत्तेत घेऊन पदे द्यावीत.’
माजी आमदार अशोक जांभळे म्हणाले, ‘मी उमेदवारी अर्ज भरला आहे. शनिवारी माघार घेणार आहे. धैर्यशील माने म्हणाले, ‘बैठकीसाठी येताना मोबाईलवर मॅसेज आला. ‘निवडणूक बिनविरोध होणार’ असा तो मॅसेज होता. त्यावेळी गाडीत असलेल्या सहकाऱ्यांमध्ये कुजबुज सुरू झाली. ‘आता कस होणार’ म्हणून. हा विनोदाचा भाग सोडून देऊ मात्र या निवडणुकीत प्रामाणिकपणे राष्ट्रवादी सतेज पाटील यांच्या पाठीशी राहील.’ नगरसेवक राजेखान जमादार म्हणाले, ‘मंडलिक गटाचीही अधिकृत भूमिका जाहीर होईल; पण मी मंडलिक गटाचा कार्यकर्ता म्हणून पाटील यांना पाठिंबा आहे. मीही अर्ज माघारी घेणार आहे.
मुश्रीफ यांचे स्पष्टीकरण..
दिल्लीत असल्यामुळे आमदार संध्यादेवी कुपेकर, माजी खासदार निवेदिता माने, राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील आजच्या बैठकीला उपस्थित राहू शकलेले नाहीत. कोणीही गैरसमज करून घेऊ नये, असे स्पष्टीकरणही मुश्रीफ यांनी केले.
सहलीसाठी तयार रहा...
निवडणुकीत राष्ट्रवादीच्या सर्व सदस्यांनी दहा ते पंधरा दिवस वेळ द्यावा. कोणतीही कारणे सांगू नयेत. सर्व कारणे आम्हाला माहीत आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांनी परदेशात नव्हे देशात सहलीसाठी जाण्यासाठी तयार राहावे, असेही मुश्रीफ यांनी जाहीर करून टाकले.
...तर नंतर वसुली होईल
विधानपरिषदेच्या दोन निवडणुकीचा अनुभव आहे. गेल्या निवडणुकीत महादेवराव आणि जयंत पाटील यांच्यात लढत झाली. कालांतराने महाडिक आणि जयंतराव एकत्र आले. त्यावेळी दोघांकडूनही निवडणुकीत कुणी किती पैसे घेतले हे पुढे आल्यानंतर वसुली सुरू झाली. त्यामुळे या निवडणुकीत असले काही करू नका. कोणाचेही राजकीय नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली जाईल. नशिबात जे आहे ते मिळेल, असे मुश्रीफ यांनी सांगितले. मी ‘निवडणूक बिनविरोध’ करणार म्हटल्यानंतर अनेकांच्या पोटात गोळा आला आहे. ‘आता काय होणार,’ अशी कुजबुज सुरू झाली आहे, असे सांगण्यासही ते विसरले नाहीत.
प्रकाश आवाडे यांची माघार;
सतेज पाटील यांना पाठिंबा
विधानपरिषदेची काँग्रेसची उमेदवारी आपणालाच मिळेल, असे शेवटपर्यंत वाटत होते; पण काँग्रेस श्रेष्ठींनी सतेज पाटील यांना उमेदवारी दिल्याने आपण माघार घेतली. आता पाटील यांच्या विजयासाठी कंबर कसणार असल्याची ग्वाही, माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना दिली. आवाडे यांनी माघार घेतल्याने सतेज पाटील यांची लढत सोपी झाली असून काँग्रेसअंतर्गत राजकारणातील बदलाचे संकेत त्यातून मिळत आहेत. - वृत्त / ४