मुश्रीफांचा ‘पास’ अन् बंटीचा अचूक ‘गोल’
By admin | Published: December 31, 2015 12:46 AM2015-12-31T00:46:12+5:302015-12-31T00:46:38+5:30
आठवणी ताज्या : ‘गडहिंग्लज’च्या मैदानावरील ‘पास’ची निकालानंतरही चर्चा
राम मगदूम -- गडहिंग्लज -विधान परिषद निवडणुकीत ‘काँगे्रस’ची उमेदवारी मिळविण्यात बाजी मारल्यानंतर आघाडी धर्म पाळणाऱ्या आमदार हसन मुश्रीफ यांनी ‘पास’ दिला. त्यानंतर विनय कोरे-सावकरांकडूनही ‘बाय’ मिळवून माजी मंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी ऐतिहासिक गोल नोंदविला. तो देखील ६५ मतांच्या फरकाने.
त्याची हकिकत अशी, नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा. विधान परिषदेचे घोडेमैदान जवळ आलेले. काँगे्रसच्या तिकिटासाठी विद्यमान आमदार महादेवराव महाडिक आणि माजी मंत्री पाटील यांच्यात जोरदार रस्सीखेच चाललेली. त्याच दरम्यान गडहिंग्लज युनायटेड फुटबॉल असोसिएशनतर्फे येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर भरविलेल्या ‘राष्ट्रीय फुटबॉल’ स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यासाठी मुश्रीफ व पाटील हे दोघेही व्यासपीठावर एकत्र होते.
२१ नोव्हेंबर २०१५ला ‘गडहिंग्लज’च्या मैदानावरील मुश्रीफ आणि बंटींच्या ‘शेरेबाजी’ची जिल्हाभर जोरदार चर्चादेखील झाली. त्यावेळी भाषणात सतेज पाटील म्हणाले होते, विधान परिषदेसाठी माझी जोरदार तयारी सुरू आहे; परंतु या सामन्यात ‘पास’ महत्त्वाचा ठरणार आहे. मुश्रीफांनी मला ‘पास’ द्यावा, मी नक्कीच ‘गोल’ नोंदवितो.
मुश्रीफ म्हणाले होते. ‘पास’ देण्याची आमची तयारी आहे; परंतु त्याआधी सतेजनी ‘काँगे्रस’च्या तिकिटासाठी जोरदार सरावा करावा. तिकीट मिळविले, तरच त्यांना आमचा ‘पास’ मिळू शकेल.
दरम्यान, ‘काँगे्रस’च्या तिकिटासाठी पाटील आणि महाडिक यांच्यात झालेली रस्सीखेच अवघ्या महाराष्ट्राला सर्वश्रृत आहे. काँगे्रसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे व स्वत: आपण तिघेही इच्छुक आहोत. तिघांपैकी कुणालाही उमेदवारी द्या. मात्र, ‘सतेज’ना तिकीट नको, अशी मागणी महाडिकांनी काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे उघडपणे केली. त्यामुळे काँगे्रसचे ‘श्रेष्ठी’ही धर्मसंकटात पडले होते.
तथापि, प्रत्येक निवडणुकीत ‘सोयी’ची भूमिका घेणाऱ्या महाडिकांनाच काँगे्रसने दूर ठेवले आणि उमेदवारीची माळ ‘सतेज’ यांच्या गळ्यात पडली. तिथेच त्यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला. जिल्हाध्यक्ष पी. एन. पक्षाचे उमेदवार म्हणून ‘सतेज’सोबत राहिले, तर स्वत:ची अपक्ष उमेदवारी मागे घेऊन प्रकाशअण्णा आवाडेंनीही ‘सतेज’नाच साथ दिली. त्यामुळेच त्यांची उमेदवारी अधिक ‘भक्कम’ झाली.
मुश्रीफांनी ‘सतेज’ यांच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच ‘सतेज’ना पास दिला. त्यानंतर ‘मैत्र’ जपण्यासाठी सावकरांनीही त्यांनाच ‘बाय’ दिला. त्यामुळेच ‘सतेज’नी मारलेल्या किकचे ‘गोल’मध्ये रूपांतर झाले.
२१ नोव्हेंबर २०१५च्या गडहिंग्लज येथील एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर आयोजित राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात आमदार हसन मुश्रीफ यांच्या ‘पास’च्या ‘शेरेबाजी’मुळे व्यासपीठावर असा हास्यकल्लोळ रंगला होता.