सोमय्या यांनी चौकशीसाठी कारखान्यात खुशाल जावे मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर : ताप आल्याने तपासणीसाठी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:25 AM2021-09-19T04:25:54+5:302021-09-19T04:25:54+5:30
कोल्हापूर : मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशीच माझ्या अंगात ताप होता. तो ताप कमी न आल्याने मी ज्या रुग्णालयात नियमित तपासणी करतो ...
कोल्हापूर : मंत्रिमंडळाच्या बैठकीदिवशीच माझ्या अंगात ताप होता. तो ताप कमी न आल्याने मी ज्या रुग्णालयात नियमित तपासणी करतो त्या मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात दाखल झालो असून, आता ताप कमी आल्याची माहिती ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी शनिवारी दिली. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी फक्त संताजी घोरपडे कारखान्यांवर न जाता कारखान्यात जावे, त्यांना जी काही हवी ती खुशाल चौकशी करावी, असेही खुले आव्हान त्यांनी दिले आहे.
मुश्रीफ यांच्याविरोधात सोमय्या यांनी गैरव्यवहाराची ईडीकडे तक्रार केली आहे. त्यामुळे त्या ताणामुळे त्यांची प्रकृती बिघडली अशा स्वरुपाची चर्चा सोशल मीडियावर सुरू होती. त्यामुळे मुश्रीफ यांनी आजारपणाचे नेमके कारण सांगून त्या चर्चेत तथ्य नसल्याचे स्पष्ट केले.
सोमय्या हे कागल तालुक्यातील संताजी घोरपडे कारखान्यांवर जाणार असल्याचे समजले आहे. परंतु, त्यांनी फक्त कारखान्यावर न जाता कारखान्यात जावे. त्यांना जी काही हवी ती चौकशी करावी. तिथे एक नया पैशाचाही गैरव्यवहार आढळला तर मी कोणतीही शिक्षा भोगायला तयार आहे. हा कारखाना म्हणजे एक अद्भुत चमत्कार आहे. गोरगरीब ५० हजार शेतकऱ्यांकडून त्यांच्या घामाचे पैसे गोळा करून अत्यंत कमी कालावधीत या कारखान्याची आम्ही उभारणी केली आहे. त्या कारखान्यांवर व माझ्या सार्वजनिक प्रतिमेवर कोणतरी उठतो आणि शिंतोडे उडवत असेल तर ते सहन करणार नाही. ही प्रतिमा निर्माण करण्यासाठी मी आयुष्यातील पाच-पंचवीस वर्षे खर्ची घातली आहेत.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, अंगावर ताप काढणे योग्य नाही असे डॉक्टरांचे म्हणणे पडले. सध्या डेंग्यूची साथ सुरू आहे. त्यात प्लेटलेट कमी होण्याचा धोका असतो. त्यासाठी रक्ताची तपासणी करणे गरजेचे असते. त्यामुळे रुग्णालयात राहूनच दोन-तीन दिवस विश्रांती घ्या व सर्व तपासण्या करू या असे त्यांनी सुचविल्यानुसार मी रुग्णालयात दाखल झालो आहे. सध्या माझा ताप कमी आहे.