मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 06:16 AM2019-01-29T06:16:00+5:302019-01-29T06:16:27+5:30

राष्ट्रवादीच्या परिवर्तन यात्रेला कोल्हापुरात पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट

Mushrif's supporters stopped Mahadik's speech | मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले

मुश्रीफसमर्थकांनी महाडिक यांचे भाषण रोखले

googlenewsNext

कागल (जि.कोल्हापूर): राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन यात्रेच्या कागल येथील सोमवारी झालेल्या सभेत खासदार
धनंजय महाडिक हे पक्षाचे नेते व तालुक्याचे आमदार हसन मुश्रीफ यांचे नाव घेण्यास अनावधानाने विसरल्याने मुश्रीफ यांच्या कार्यकर्त्यांनी महाडिक यांचे भाषण रोखले. जोरदार शेरेबाजी करून काही कार्यकर्त्यांनी ‘तुम्ही पाच वर्षे कुठे होता..?’ अशीही विचारणा केली.

पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासमोरच हा प्रकार घडला. त्यामुळे खासदार महाडिक कमालीचे नाराज झाले. मुश्रीफ यांनी कार्यकर्त्यांना दम दिला व महाडिक यांना पुन्हा बोलण्यास उभे केले; पण या यात्रेला या घटनेमुळे पक्षांतर्गत गटबाजीचे गालबोट लागले. मूळ यात्रेपेक्षा या गटबाजीची व घटनेचीच जास्त दिवसभर झाली.

गेले काही दिवस कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीमध्ये खासदार महाडिक यांच्या उमेदवारीला होत असलेला विरोध आणि माजी मंत्री आमदार मुश्रीफ यांच्याशी निर्माण झालेल्या मतभेदाचे पडसाद यावेळी उमटले. सोमवारी सकाळी कागल येथे सभा आयोजित केली होती.
या सभेत खासदार महाडिक बोलण्यास उभे राहिले. त्यांनी ज्येष्ठतेनुसार अजित पवार, जयंत पाटील व तालुक्याचे कर्तबगार आमदार जयंत पाटील अशी नावे घेतली. बोलण्याच्या ओघात मुश्रीफ यांच्याऐवजी जयंत पाटील यांचेच नाव घेतले असण्याची शक्यता आहे. यातून कार्यकर्त्यांची शेरेबाजी सुरू झाली. तुम्हाला त्यांनी निवडून आणले आहे हे विसरला काय, असेही काहीजण सभेतून म्हणत होते. शेरेबाजी सुरु राहिल्यामुळे महाडिक यांनी भाषणच थांबविले व ते आपल्या जागेवर जाऊन बसले. त्यामुळे सभास्थळी काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. यानंतर अजित पवार यांनी मुश्रीफ यांना सूचना केली.

लगेच मुश्रीफ यांनी माईक हातात घेतला व त्यांनी त्यांच्या स्टाईलमध्ये कार्यकर्त्यांना ‘ये गप्प बसा रे..’ असा दम व्यासपीठावरूनच दिला. यानंतर कार्यकर्ते शांत झाले. यानंतर मुश्रीफ यांनी खासदार महाडिक यांना माईकजवळ आणले व भाषण करण्याची सूचना केली.
महाडिक यांनी ‘माझे आणि तुमचे नेते हसन मुश्रीफ..’ अशी सुरुवात करून पुन्हा भाषण केले व दिलगिरी व्यक्त करीत
भाषण पूर्ण केले. नंतर परिवर्तन यात्रेतील अन्य नेत्यांची भाषणे झाली; परंतु दिवसभर चर्चा झाली ती पाच मिनिटे घडलेल्या या घटनेचीच.

उमेदवार कोणीही असो, पाठीशी राहा : अजित पवार
या वेळी अजित पवार म्हणाले, शरद पवार यांचे बळकट हात कायमच हसन मुश्रीफ यांच्याही पाठिशी राहिले आहेत. मतभेद असू शकतात; पण एकदा पवार यांनी उमेदवार दिला की त्याला निवडून आणण्याची जबाबदारी कागलकरांनी घेतली पाहिजे. ‘पवारसाहेबच उमेदवार आहेत, असे समजून इमानदारीने तुम्ही काम केले पाहिजे. उमेदवार धनंजय महाडिक असोत किंवा अन्य कोणी, तुम्ही त्यांच्या पाठिशी राहिले पाहिजे. पवार यांच्यासमोर मुश्रीफ यांना कमीपणा येऊ देऊ नका. माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे. या वेळेपुरते ऐका. मी तुम्हाला व्याजासह परत देतो.’

Web Title: Mushrif's supporters stopped Mahadik's speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.